राजुरात प्रथमच १० दिवसीय ‘कलारंग २०२६’ नाट्य व चित्रपट निर्मिती कार्यशाळा
▪️मुंबई-पुण्यातील अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन; उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना रोख पारितोषिके

राजुरा:नाट्य, अभिनय आणि चित्रपट क्षेत्रात आपले करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राजुरा शहरात प्रथमच १० दिवसीय ‘कलारंग २०२६’ नाट्य तथा चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छंदी समूह संस्थेच्या वतीने आयोजित ही कार्यशाळा १० जून ते २० जून २०२६ या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, आसिफाबाद रोड, राजुरा येथे दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संयोजक प्रणित झाडे, सल्लागार दिलीप पाटील, सहसंयोजक निखिल खोब्रागडे, ज्येष्ठ सल्लागार ॲड. मधुकर कोटनाके आणि ज्येष्ठ रंगकर्मी ओमप्रकाश गुंडावार यांनी माहिती दिली.
या कार्यशाळेत प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे व अनुराग कश्यप यांच्यासोबत काम केलेले अभिनेते व दिग्दर्शक विक्की मोटे यांच्यासह पुण्याचे प्रशिक्षक मितेश ताके, चंद्रपूरचे प्रशिक्षक जगदीश नांदूरकर आणि आकाश कडूकर हे अनुभवी प्रशिक्षक प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेदरम्यान ऑडिशनची तयारी, प्रोफाइल निर्मिती, कास्टिंग डायरेक्टरशी संपर्क साधण्याच्या पद्धती, वक्तृत्व कला, रंगमंचीय अभिनय, स्क्रीन अभिनय, प्रकाशयोजना, संगीत योजना, रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा यांसह १६ महत्त्वाच्या घटकांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे ८ ते १८ वर्षे आणि १९ ते ४५ वर्षे अशा दोन गटांमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार दिले जाणार असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, रिल्स मेकर, फोटोग्राफर, लघुपट निर्माते, मेकअप आर्टिस्ट तसेच कला क्षेत्राची आवड असलेल्या सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली आहे. कार्यशाळेदरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थींना घेऊन एक लघुपट आणि एक एकांकिका तयार करण्यात येणार आहे.
राजुरा, कोरपना, गोंडपिपरी आणि जीवती तालुक्यातील दडलेले कलागुण शोधून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक प्रणित झाडे यांनी सांगितले.
कार्यशाळेसाठी केवळ ४० जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








