लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन उत्साहात साजरा
घुग्घुस : महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्य, स्वच्छता व सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण केंद्र (FTC), मुरसा येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बेलसणी, म्हातारदेवी, मुरसा, शेणगाव, उसगाव, नकोडा, पांढरकवडा, धानोरा आणि वढा येथील महिला व किशोरी मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दरवर्षी २८ मे रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या या दिनाचे प्रमुख उद्दिष्ट मासिक पाळीबाबत समाजामध्ये असलेले गैरसमज, रूढी, अंधश्रद्धा व संकोच दूर करून महिलांमध्ये आणि किशोरी मुलींमध्ये स्वच्छता व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, योग्य सॅनिटरी पॅडचा वापर, पॅडची सुरक्षित विल्हेवाट, संतुलित आहार, रक्तक्षय प्रतिबंध तसेच महिलांच्या सर्वांगीण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सहकार्याने मोबाईल कॅन्सर तपासणी व्हॅन कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्रामीण भागातील महिलांमध्ये कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करणे, प्रारंभिक लक्षणांची माहिती देणे आणि वेळेत तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी मोबाईल कॅन्सर व्हॅनच्या डॉ. रश्मी येवले आणि डॉ. रेणू यांनी उपस्थित महिलांना स्तन कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर (सर्व्हायकल कॅन्सर) तसेच इतर कॅन्सरच्या लक्षणांबाबत, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित तपासणीचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन देखील करण्यात आले.
कार्यक्रमात लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना मासिक पाळी स्वच्छतेचे महत्त्व, पोषण, आरोग्यदायी जीवनशैली तसेच किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. महिलांचे आरोग्य हे कुटुंब व समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
तसेच डॉ. पायल कोंडेकर आणि डॉ. स्नेहा बक्षी यांनी उपस्थित महिला व युवतींशी संवाद साधत मासिक पाळीविषयी गैरसमज दूर केले. त्यांनी किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता, योग्य आहार, रक्तक्षय प्रतिबंध, मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास वृद्धी याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. संवादात्मक सत्राद्वारे सहभागी महिला व किशोरी मुलींनी आपल्या शंका, अनुभव आणि समस्या मोकळेपणाने मांडल्या. तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधानकारक निरसन केले.
या कार्यक्रमाला सुमारे ३५० हून अधिक महिला व किशोरी मुलींची उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान मासिक पाळी स्वच्छता, पोषण, महिला आरोग्य आणि कॅन्सर प्रतिबंध याविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे महिलांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सक्षमीकरण यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असून हा कार्यक्रम त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना मासिक पाळी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत आपल्या कुटुंबात व समाजात याबाबत सकारात्मक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानसी खोबरागडे, मोनिका ठाकरे, लता बावणे, निशा पिंपळकर, ममता मोरे, प्रिया पिंपळकर, मंजुषा वडास्कर, मनीषा वडास्कर आणि अश्विनी खोबरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत महिलांच्या आरोग्यविषयक अशा जनजागृतीपर उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.







