Home चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासकामाला मिळणार गती; तांत्रिक अडचणी होणार दूर

दीक्षाभूमीच्या विकासकामाला मिळणार गती; तांत्रिक अडचणी होणार दूर

0
39

दीक्षाभूमीच्या विकासकामाला मिळणार गती; तांत्रिक अडचणी होणार दूर

आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून सोसायटीच्या सदस्यांची मंत्र्यांशी बैठक

चंद्रपूर : चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या सूचनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या सदस्यांनी आज वर्धा येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत प्रलंबित तांत्रिक अडचणी दूर होताच तातडीने विकासकामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शिरसाट यांनी दिले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सचिव वामराव मोडक, प्रा. मनोज सोनटक्के, प्रा दिलीप रामटेके आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळ असून, नागपूरनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथेही दीक्षा दिली होती. त्यामुळे या पवित्र स्थळाच्या विकासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी या ठिकाणाचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
या विकासकामांसाठी पहिल्या टप्यात सुमारे ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी आमदार जोरगेवार यांच्या अथक प्रयत्नांतून मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, या विकासकामाच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामात अडथळे येत होते. या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय बाबींवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक मुद्द्यांचा आढावा घेत त्यावर तातडीने तोडगा काढण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकल्पाबाबत गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देत कामांना गती देण्याचे निर्देश दिले. तसेच, दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासकामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, देशभरातील अनुयायांसाठी हे ठिकाण अधिक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!