Home चंद्रपूर आ. किशोर जोरगेवार यांच्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद; ८३ रुग्णांवर होणार मोफत...

आ. किशोर जोरगेवार यांच्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद; ८३ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

0
78

आ. किशोर जोरगेवार यांच्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद; ८३ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

चंद्रपूर : सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या आरोग्य उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धानोरा येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरातून निवड झालेल्या ८३ रुग्णांवर आता वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर तालुका यांच्या वतीने आयोजित या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर गंभीर आजार असलेल्या ८३ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना आज (बुधवार) वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.
या रुग्णांवर मोतीबिंदू, हृदयरोग, गर्भाशयाशी संबंधित आजार तसेच इतर विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे मोठ्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत. अशा परिस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम गरजूंसाठी जीवनदायी ठरत आहे. या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळणार आहे.
आमदार जोरगेवार यांनी नेहमीच जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत विविध उपक्रम राबविले आहेत. केवळ राजकीय कामांपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या आरोग्य, शिक्षण आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसून येत आहे. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!