Home चंद्रपूर राजुरा राजुरा येथे “शिक्षण बचाव समन्वय समिती”ची तालुका कार्यकारिणी गठित गावखेड्यातील शाळा...

राजुरा येथे “शिक्षण बचाव समन्वय समिती”ची तालुका कार्यकारिणी गठित गावखेड्यातील शाळा बंदीविरोधात उभारली शिक्षण बचाव चळवळ

0
485

राजुरा येथे “शिक्षण बचाव समन्वय समिती”ची तालुका कार्यकारिणी गठित

गावखेड्यातील शाळा बंदीविरोधात उभारली शिक्षण बचाव चळवळ

राजुरा : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान आणि मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला असताना शासनाच्या शिक्षण धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत शिक्षण बचाव समन्वय समिती – राजुरा, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने आज दिनांक 08 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, साईनगर राजुरा येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत ग्रामीण भागातील सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी स्पष्टपणे नमूद केले की, भारतीय संविधानानुसार प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही केंद्र व राज्य शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र शासन कमी पटसंख्येचे कारण पुढे करून तसेच नवीन संचमान्यता निकष लागू करून शिक्षकांची संख्या कमी करत आहे. परिणामी गावखेड्यातील सरकारी शाळा बंद करण्याचा सपाटा सुरू असून यामुळे बहुजन, गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार धोक्यात येत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या समान, मोफत आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या तत्त्वांची आठवण करून देत उपस्थितांनी शिक्षण वाचवण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली.

बैठकीदरम्यान “शिक्षण वाचवा – शाळा वाचवा” ही व्यापक जनजागृती मोहीम राजुरा तालुक्यात राबवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गावोगावी लोकप्रबोधन, संवाद आणि संघटन बळकट करून शिक्षण हक्कासाठी लढा उभारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी सर्वानुमते अमोल राऊत यांची अध्यक्ष मंडळ समन्वयक म्हणून तर अँड. डॉ. मधुकर कोटनाके यांची सचिव मंडळ समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी एकमुखाने घोषणा देत सांगितले की “शिक्षणाच्या हक्कासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून लढा देऊ आणि शिक्षण बचाव चळवळ अधिक मजबूत करू.”

या बैठकीला धीरज मेश्राम, वामन साळवे, दिनेश पारखी, प्रभाकर गेडाम, प्रवीण कुमरे, अँड. डॉ. मधुकर कोटनाके, विलास सोयाम, सुरेंद्र फूसाटे, धनराज उमरे, चरणदास मोते, विजय भोयर, वीरेंकुमार खोब्रागडे, श्रेयस गोंगले, गजानन तपासे, रमेश आडे, हरिदास गौरकर, सुरेश बोंडे, अमोल राऊत आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!