राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली नियमांची खुलेआम पायमल्ली
ग्रील इन्फ्राचे सायंकाळी सुरू असलेले उत्खनन तात्काळ थांबवा; जय भवानी कामगार संघटनेची तक्रार
राजुरा:केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी ग्रील इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड ही कंपनी सर्रासपणे महाराष्ट्र शासनाच्या नियमांची पायमल्ली करत असल्याचा गंभीर आरोप जय भवानी कामगार संघटना, चंद्रपूर यांनी केला आहे. यासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार, राजुरा यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर करून नियमबाह्य उत्खनन तात्काळ थांबवण्यासह कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रील इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड ही कंपनी नॅशनल हायवेचे काम करीत आहे. या कामासाठी गौण खनिजांची आवश्यकता असल्याने शासनाने चुनाळा गावांतर्गत एका निश्चित क्षेत्रात उत्खननाची परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी काही स्पष्ट अटी व शर्तींसह देण्यात आली असून, संध्याकाळी सहा वाजेनंतर उत्खनन करण्यास बंदी, झाडतोडीवर मनाई तसेच वन्यजीव व पर्यावरणाला हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य न करण्याची अट त्यात समाविष्ट आहे.
असे असतानाही ग्रील इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी कडून संध्याकाळी सहा वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर जोमाने उत्खनन सुरू असल्याचे, तसेच परवानगी दिलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात नियमबाह्य उत्खनन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे निसर्गाची मोठी हानी होत असून परिसरातील पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे.
जय भवानी कामगार संघटनेने मागणी केली आहे की, सदर नियमबाह्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून कंपनीने वापरलेली सर्व यंत्रसामग्री व वाहने जप्त करावीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी तसेच पर्यावरणाला नुकसान पोहोचवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा.
संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, या तक्रारीवर २४ तासांत कार्यवाही न झाल्यास संघटनेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष स्थळी जाऊन आंदोलन करून काम बंद पाडतील. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही तक्रार अर्जात नमूद आहे.
या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.








