वाळू माफियांचा उन्माद; पत्रकारावर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला?
कोरपणा तालुक्यात गुन्हेगारीचे राज्य? पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय?
कोरपणा : दि. 20 जानेवारी 2026
कोरपणा तालुक्यातील भोयगाव परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव मंगळवारी उघडकीस आले. वाळू माफियांच्या दहशतीविरोधात आवाज उठवणाऱ्या एका युवा पत्रकारावर दिवसाढवळ्या मद्यप्राशन करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, “पत्रकारच सुरक्षित नसतील तर लोकशाही टिकणार कशी?” असा सवाल उपस्थित होत आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा युवा पत्रकार निखिल गजानन पिदूरकर (वय 26, रा. ईरई, भोयगाव) हे एकोडी फाटा ते भोयगाव–कवठाळा मार्गावरून जात असताना दुपारी साडे दोन ते तीनच्या दरम्यान आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. मद्यधुंद अवस्थेत विजय गोरे (रा. एकोडी) व प्रविण ठावरी (रा. भोयगाव) यांनी संगनमताने शिवीगाळ, धमक्या देत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पत्रकार निखिल पिदूरकर गंभीर जखमी झाले असून त्यांचा मोबाईल फोडून आर्थिक नुकसानही करण्यात आले.
या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 296, 115(2), 324(4), 351(2), 3(5) अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याची चर्चा असून, यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, भोयगाव परिसरात अवैध वाळू उपसा व गुन्हेगारी कारवायांबाबत वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाने वेळेत कठोर पावले न उचलल्याने माफियांचे मनोबल वाढल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पत्रकारावर हल्ला होईपर्यंत प्रशासन झोपेत होते का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी, पत्रकार संरक्षण कायदा प्रभावीपणे राबवावा आणि वाळू माफियांवर मोठी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे.
पत्रकारावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे. प्रशासन आता तरी जागे होणार का, की पुढील एखाद्या रक्तरंजित घटनेची वाट पाहणार?
— हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेसमोर उभा आहे.






