Home चंद्रपूर राजुरा विहीरगाव शाळा लाकूड चोरी प्रकरणात कायद्याचे उल्लंघन; मुख्याध्यापक–सरपंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

विहीरगाव शाळा लाकूड चोरी प्रकरणात कायद्याचे उल्लंघन; मुख्याध्यापक–सरपंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
84

विहीरगाव शाळा लाकूड चोरी प्रकरणात कायद्याचे उल्लंघन;

मुख्याध्यापक–सरपंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

राजुरा:दि. 26 जानेवारी 2026 राजुरा तालुक्यातील केंद्र नलफडी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल, विहीरगाव येथील शाळेच्या आवारातून सागवान जातीच्या शासकीय झाडांची लाकूड चोरी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक व ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या भूमिकेवर संशय अधिक गडद होत असून, गावात तीव्र चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.काही महिन्यांपूर्वी आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या आवारातील अनेक शासकीय झाडे कोसळली होती. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी ठेकेदाराच्या मदतीने पडलेल्या झाडांची लाकडे एकत्र करून शाळेच्या परिसरात ठेवली होती. मात्र काही दिवसांतच सागवान चे लाकूड गायब असल्याचे निदर्शनास आले, त्या लाकडाची अंदाजे बाजार किंमत १लाखाच्या वर आहे.त्यामुळे चोरीचा संशय बळावला.

या प्रकरणाच्या चौकशीत गावातील नागरिकांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने लाकडे नेण्यात आल्याची माहिती दिली,तसेच ही लाकडे गावच्या सरपंचांच्या शेतात नेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शाळेच्या जुन्या इमारतीतील मुद्देमालाचा लिलाव सुरू असताना चोरीस गेलेली लाकडे तिथे नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले.

कायद्यानुसार शासकीय जमिनीवरील झाडे व लाकूड ही राज्य शासनाची मालमत्ता असते.परवानगीशिवाय त्याचा उठाव, वाहतूक किंवा वापर करणे दंडनीय गुन्हा आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303 (चोरी), 316 (आपराधिक विश्वासघात), 318 (फसवणूक) तसेच महाराष्ट्र वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

कायदेपंडितांच्या मते फक्त लाकूड परत दिल्याने गुन्हा संपत नाही,तर एफआयआर, पंचनामा,जप्ती व जबाब नोंदवणे आवश्यक आहे.

या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला वेळेत माहिती न देता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. अखेर 26 जानेवारी रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या विशेष बैठकीत पोलीस तक्रार दाखल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष स्वप्नील वाढई,उपाध्यक्ष अंकिता तेलंग, सचिव मदन गुल्हाने तसेच सदस्य रुपाली संदीप तेलंग,गीता रविंद्र रागीट, सोमेश्वर देवईकर,संध्या संजय भोयर,प्रमोद मते, सविता रविंद्र चौधरी उपस्थित होते.

कोट–मदन गुल्हाने, मुख्याध्यापक, जि. प. हायस्कूल, विहीरगाव

“या घटनेबाबत मला आधी कोणतीही माहिती नव्हती. शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेतल्यानंतर सरपंचांना माहिती देण्यात आली. सरपंचांनी सागवान लाकूड परत आणून दिल्यानंतर आम्हाला पुढील कारवाईची गरज वाटली नाही आणि विषय तेथेच संपला.”

मात्र या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

काउंटर बाईट – सुजान नागरिक (रागीट), विहीरगाव

“शासकीय मालमत्तेची चोरी केवळ लाकूड परत दिल्यामुळे संपली असे मानणे अत्यंत गंभीर आहे. जबाबदार पदांवरील व्यक्तीच असा पायंडा पाडत असतील तर विद्यार्थ्यांना काय संदेश मिळेल? चोरी व खोटेपणाला प्रोत्साहन मिळेल की काय, अशी भीती आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

या प्रकरणात तातडीने एफआयआर दाखल करून निष्पक्ष चौकशी, पंचनामा, जप्ती व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थ व पालकवर्गातून होत आहे, जेणेकरून भविष्यात शासकीय मालमत्तेशी अशा प्रकारे गैरवर्तन होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!