
खामोना येथे पहाटे आग; शेडमाके कुटुंबाचा घरसंसार जळून खाक, पंचनामा प्रक्रियाची वाट
अमोल राऊत
संपादक
राजुरा: राजुरा तालुक्यातील गडचांदूर–आदिलाबाद मुख्य महामार्गालगत असलेल्या खामोना गावात आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागून एका कुटुंबाचा संपूर्ण घरसंसार जळून खाक झाला. फुलनबाई विश्वेश्वरराव शेडमाके यांच्या घरात घडलेल्या या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून शेडमाके कुटुंब सध्या संकटात आले आहे.
घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. अशोक शेडमाके हे लघुशंकेसाठी घराबाहेर गेले असता त्यांना घरातील सायनाला आग लागलेली दिसली. आगीच्या ज्वाळा आणि धूर पाहताच त्यांनी जोरात आरडाओरडा केला. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेजारील नागरिक आणि ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावून आले. पाणी, रेती व उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. अनेक तासांच्या मेहनतीनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या आगीत घरातील डाळ,तांदूळ, गहू, भांडी, प्लॅस्टिकचे ड्रम, फाडी, अंथरूण–पांघरूण, कपडे तसेच दैनंदिन वापरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. गरीब कुटुंबाचा वर्षानुवर्षांचा साठवलेला संसार काही तासांत राखेत बदलल्याने शेडमाके कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे.
या घरात अशोक शेडमाके (वय ४२, मजुरी), पत्नी वर्षा शेडमाके (वय ३३), दोन शिक्षण घेणाऱ्या मुली नंदिनी व पाखी आणि आई फुलनबाई असे पाच जण राहत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब मोठा दिलासा देणारी ठरली आहे.

घटनेची माहिती पोलिस पाटील विजय पादे यांनी तत्काळ तलाठी व तहसीलदारांना दिली असून तहसील कार्यालय राजुरा यांच्यामार्फत पंचनामा व पुढील चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण घरसंसार जळून गेल्याने शेडमाके कुटुंब सध्या गंभीर अडचणीत सापडले असून शासन व प्रशासनाकडून तातडीची आर्थिक व पुनर्वसनात्मक मदत मिळावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.





