स्वराज्य सहकारी गृहनिर्माण सोसायटी तर्फे आंदोलन, मासळी बाजार तात्काळ स्थलांतरित करावा, दादरला न्याय द्या!
मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
दिनांक २९ सप्टेंबर २०२५ : दादर – स्वराज्य सहकारी गृहनिर्माण सोसायटी तर्फे काल परिसरातील २०० हून अधिक स्थानिक रहिवासी व नागरिकांनी मुसळधार पावसातही आंदोलनात सहभाग घेतला.
सेनापती बापट मार्गावरील अनधिकृतपणे भरत असलेल्या मासळी बाजारामुळे स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या असह्य त्रासाच्या विरोधात आज जोरदार जनआंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत स्थानिक नगरसेविका सहभागी झाले. प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा सर्वांनी एकमुखाने निषेध केला. या आंदोलनात विभाग प्रमुख आमदार महेश सावंत, प्रीती पाटणकर, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, स्थानिक शाखाप्रमुख प्रवीण नरे, महिला शाखा संघटक रीमा पारकर, यशवंत विचले, अक्षदा तेंडुलकर, जितेंद्र कांबळे, व इतर सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सह स्वराज्य गृहनिर्माण संस्थेतील अनेक रहिवासी उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या मते, या बाजारामुळे परिसरात घाण, दुर्गंधी, वाहतूक कोंडी व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मासळी बाजार कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल. नागरिकांची ठाम मागणी होती की सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजार तात्काळ स्थलांतरित करावा. ही मासळी बाजार २०२१ मध्ये पाडण्यात आला होता आणि ऑगस्ट २०२२ पूर्वी स्थलांतर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. दरम्यान, एल्फिन्स्टन ब्रिज बंद असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली असून नागरिकांनी आरोग्य, स्वच्छता, पादचारी मार्ग बंद होणे, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधीही नागरिकांसोबत सहभागी झाले व नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना पाठिंबा दिला. नागरिकांचा इशारा: जर हा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही, तर नागरिक न्यायालयात धाव घेतील. तसेच, आगामी निवडणुकांचा दादरकरांकडून बहिष्कार टाकण्यात येईल. दरम्यान, आंदोलनाच्या आदल्या दिवशी दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आयोजकांना BNSS कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावली व मासळी बाजारासमोर आंदोलन करण्यास मनाई केली. सोसायटीच्या गेटवर लावलेले आंदोलनाचे बॅनरही पोलिसांनी काढून टाकले. आज आंदोलनावेळी सोसायटी गेट पोलिसांनी बॅरिकेड करून नागरिकांना मासळी बाजारासमोर जाण्यापासून रोखले. तरी सुद्धा, नागरिकांनी एकजुटीने सोसायटी परिसरातच शांततापूर्ण आंदोलन करत आपला आवाज बुलंद केला. दादरकरांची मागणी एकच मासळी बाजार तातडीने स्थलांतर करा, दादरला न्याय द्या!








