सीसीआय मार्फत शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या कापसाची रक्कम कर्जाच्या खात्यातून कपात करू नका-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
हिंगणघाट । अनंता वायसे – सीसीआय मार्फत शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या कपासाची रक्कम कर्जाच्या खात्यातून कपात न करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने सीसीआय मार्फत हमी भावाने कापूस खरेदीला सुरुवात झाली हमी भाव मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस सीसीआयला विकला कापसाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी पासबुकची झेरॉक्स प्रत जमा केली.
परंतु सीसीआयने सदर कापसाचे चुकारे लिंकद्वारे शेतकऱ्यांनी दिलेल्या खात्यात जमा न करता शेतकऱ्यांच्या कर्जाच्या दुसऱ्या बँकेतील खात्यात जमा केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झालेली रक्कम बँकेने कापून घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे कापलेली रक्कम शेतकऱ्यांनी दिलेल्या खात्यात जमा करून दिलासा द्यावा.
यावर्षी खरिपाच्या हंगामात सोयाबीनचे पिक खोडकिडी व बुरशीजन्य किडीच्या प्रादुर्भावाने नष्ट झाले आहे सोयाबीनचे उत्पन्न एकरी एक किलो झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात गुरे-ढोरे सोडून चारून टाकले आणि काहींनी शेतात रोटावेटर मारून रब्बीच्या हंगामासाठी तयार करून पेरणी केली कपासीच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ऑक्टोंबर महिन्यात पराट्या उपडण्यास सुरुवात केली असून शेतात जनावरे चारली आहे तर काहींनी पराट्या उपडुन मशागत करून गहू ,चण्याची पेरणी केली आहे.
सोयाबीन व कपासीचे पीक हातातून गेल्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे आणि अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची असताना सीसीआयने कापसाचे चुकारे कर्जाच्या खात्यातून कापल्याने कुटुंबाचे संगोपन करणे कठीण झाले आहे.
तरी सीसीआय मार्फत खरेदी केलेल्या कापसाची रक्कम कर्ज खात्यात जमा केली ती वळती करून शेतकऱ्यांला पैसे देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.