अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या…!
शून्य प्रहरात खासदार अशोक नेते यांची लोकसभेत मागणी
गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने धान, सोयाबीन व कापूस इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याचबरोबर कापणीसाठी तयार असलेल्या धान पूर्णता सडून गेले. त्यामुळे उद्योग विहीन, आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे या सर्व नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीने एकरी दहा हजार व हेक्टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दिनांक 7 डिसेंबर रोजी शून्य काल मध्ये लोकसभेत केली व शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
लोकसभेत निवेदन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, लोकसभा क्षेत्र आदिवासीबहुल उद्योग विहीन जंगलाने व्याप्त, अति दुर्गम क्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन शेती आहे मात्र दरवर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून तुटीपुंजी मदत दिली जात असल्याने पेरणीसाठी केलेला खर्चही निघत नाही. परिणामी या भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.
लोकसभा क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे धान पीक पुर्णतः सडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. कोरोनाच्या संकटकाळात येणाऱ्या वर्षाचे नियोजन कसे करायचे, आरोग्याचा खर्च कुठून करायचा, मुलांचे शिक्षण, पालन पोषण, कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न कसे करायचे या विवंचनेत येथील शेतकरी सापडला आहे. अध्यक्ष महोदय, माझी शासनाकडे मागणी आहे की, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे शेतीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपये म्हणजेच प्रति हेक्टरी पंचेवीस हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी. अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी आज संसदेत केली.