पावसाच्या पाण्याने आनंदगुडा खीरडी रस्त्यावरील पूल जमीनदोस्त, निष्कृस्ट कामाचा उत्तम नमुना
राजुरा, अमोल राऊत : तालुक्यातील लक्कडकोट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खिरडी रस्त्यावरील पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने येथील जनतेचा शेजारील गावाशी संपर्क तुटला आहे. आनंदगुडा खीरडी येथील रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १ करोड ३८ लाख ६ हजार रुपये खर्चून गेल्या वर्षभरापासून अतिशय कासवगतीने सुरु आहे. संबंधित कंत्राटदारांच्या कनिष्ठ प्रतीच्या बांधकामामुळे सदर पूल पावसाच्या पाण्यात वाहून जमीनदोस्त झाले आहे. या घटनेने खिरडी वासीयांच्या पक्क्या रस्त्याच्या अपेक्षेवर विरजण पडले असून त्यांचा सभोवतालच्या गावाशी संपर्क तुटला आहे.
सदर घटनेने या गावातील जनतेला ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. गावालगत शेती असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे संबंधित विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन या बांधकामाची चौकशी करावी. स्थानिक जनतेच्या आवागमानसाठी पक्क्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.