बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात मदतकक्ष व संपर्क सेतू केन्द्र प्रारंभ, प्रकृती संस्थेचा उपक्रम
बल्लारपूर (चंद्रपूर), किरण घाटे : प्रकृती महिला विकास केंद्र, चंद्रपूर द्वारा अनुसंधान ट्रस्ट-पुणे यांच्या सहकार्याने नुकतेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे मदतकक्ष व संपर्क सेतूचे उद्घाटन बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा यांच्या हस्ते झाले.
सध्याच्या काळात सर्व शासकीय रुग्णालय कोविड-19च्या संदर्भात सेवा देण्यात दिवस रात्र व्यस्त आहे. अश्या संकट काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेत येणाऱ्या रुग्णांना योग्य माहिती मिळवून देण्याच्या सकारात्मक हेतूने मदतकक्ष व संपर्क सेतू केन्द्र सुरु करण्यांत आले आहे . त्याचे उद्घाटन नुकतेच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूरच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. अर्पिता वावरकर , बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा ,प्रकृति महिला विकास केंद्राच्या सचिव भारती रामटेके संचालक निलेश देवतळे , जागृती महिला समाजाच्या अध्यक्षा संध्याताई एदलाबादकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मदतकक्ष स्थापन झाल्यामुळे नागरिकांना लसीकरण, कोविड-19, ऑक्सिजन तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा योजना व रुग्णालयातील सेवा सुविधा इत्यादी विषयक माहिती, सल्ला व मार्गदर्शन या केंद्रातून प्राप्त होईल असे मत नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केले व या उपक्रमास शुभेच्छा व शुभकामना दिल्या.
सदरहु केंद्रात मदतकक्ष व संपर्क सेतूचे कोऑर्डिनेटर अक्षय देशमुख व तालुका कार्यकर्ता म्हणून गोपाल टोंगे हे कार्यरत आहे. उपरोक्त आयाेजित कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व प्रकृती संस्थेच्या कार्यकर्त्या अरुणा खोब्रागडे, दिक्षा ठमके, मंगला घटे, शितल पाटील, सीमा मडावी आदीं उपस्थित होते.