कोनसरी लोह प्रकल्प सुरु झाल्याशिवाय सूरजागड लोह प्रकल्पातील लोह खनिज जिल्ह्याबाहेर जावू देणार नाही – आमदार डॉ देवरावजी होळी
लॉयड्स मेटल कंपनीने लवकरात लवकर कोनसरी येथे लोह प्रकल्प उभा करावा
कोनसरी येथील लोह प्रकल्पात स्थानिकांना नौकरी देण्याची दिलेली हमी कंपनीने पूर्ण करावी
सुखसागर झाडे : सुरजागड लोह प्रकल्पाच्या लोहखनिज उत्खननातून कोनसरी येथे लोह खनिज प्रकल्प सुरू करण्यासाठी कोनसरी येथे २०१७ मध्ये लॉइड मेटल्स च्या लोह खनिज प्रक्रीया प्रकल्पा ची पायाभरणी करण्यात आली होती परंतु आता या सुरजागड प्रकल्पातून उत्खनन झालेले खनिज जिल्ह्याबाहेर पाठवण्याचा कंपनीचा प्रयत्न असून कोनसरीचा लोह प्रकल्प पूर्णपणे सुरू झाल्याशिवाय सुरजागड लोह प्रकल्पातून निघणारा खनिज जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही असे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातुन म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉइड मेटल्स च्या लोह खनिज प्रक्रीया प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ झालेला आहे.त्यावेळी लॉयड मेटल आणि एनर्जी या कंपनीच्या वतीने अशी भूमिका घेण्यात आली होती की कोनसरी येथे ७०० कोटी रुपयांचा प्रोजेक्ट उभारला जाईल तसेच १२०० कामगारांना कोनसरी येथील प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात येतील .त्यामध्ये स्थानिक प्रकल्प ग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल .चामोर्शी विधानसभा क्षेत्रातील कोनसरी गावातील अनेक शेतकऱ्यांनी भविष्यातील आपल्या पिढ्यांचा विचार करून आपल्या सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाला सण २०१७ मध्ये दिलेल्या आहेत.अद्यापपर्यंत कंपनीने तेथे प्रकल्प उभारण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही .प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला अद्यापपर्यंत नोकरी दिलेली नाही.
ही बाब स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या त्यागाकडे अतिशय दुर्लक्ष करणारी व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या भविष्याकडे दुर्लक्ष करणारी आहे .सदर गोष्टींचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने निषेध केला आहे.
सध्या लॉयड मेटल अँड एनर्जी ही कंपनी कोनसरी येथील प्रकल्प चालू न करता सूरजागड येथून लोहखनिज परस्पर चंद्रपूर येथे प्रक्रियेसाठी घेऊन जाणार आहे व कोनसरी प्रकल्पाकडे दुर्लक्ष करत आहे .कंपनीचे हे कृत्य निंदनीय आहे व स्थानिक प्रकल्पग्रस्त व आदिवासींच्या कडे दुर्लक्ष करणारे आहे .त्यामुळे चामोर्शी विधानसभा परिक्षेत्रातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे .व त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत कंपनी लोह खनिज प्रकल्प कोनसरी येथे उभारत नाही तोपर्यंत सूरजागड येथून वाहतुक हाेणारे लोह खनिज कोणत्याही प्रकारे चंद्रपूर वाअन्य जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही.
प्रशासनाने त्वरित कंपनीच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी व तात्काळ कोनसरी येथील प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू करावी .व त्यानंतर सुरजागड येथील लाेह खनिज काेनसरी येथे आणावे .अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.