तंत्रस्नेही नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागाकडे धाव
अशिक्षित ग्रामीण लसीकरणा पासुन वंचित राहण्याची शक्यता
कोठारी, राज जुनघरे : आधिच लशीचा तुटवडा त्यात दुरसंचारची रेंज नसल्याने कोविन एपवर नाव नोंदणी करण्याचा प्रश्न ही गुंतागुंत एका बाजूला असतांनाच आता तंत्रस्नेही शहरी नागरीक ग्रामीण भागात जाऊन लशीकरण करून घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यामुळे ज्या गावांसाठी लस दिली जाते त्या गावातील नागरिकांना ती मिळत नाही. शहरी भागात केंद्र असतांनाही रांगेत उभे राहण्याऐवजी गावातील केंद्रावर जाऊन लस टोचून घेण्याचा प्रकार वाढीस लागला असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना तंत्राची जाणीव नाही, तंत्र अवगत नाही, आणि अशिक्षित गरजू गरीब जनता यामुळे लस टोचून घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोठारी आरोग्य केंद्रात कमी प्रमाणात कां होईना पण लस उपलब्ध होत आहे. येथे तंत्रस्नेही शहरी भागातील नागरिकांची झुंबड उडाली असल्याने कोठारी परिसरातील नागरिकांना लाभ मिळत नाही. तंत्रस्नेही लोकांच्या गर्दीत प्राप्त साठा संपला की स्थानिकांना ताटकळत वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
करोनास प्रतिबंध करणारी लस टोचून घेण्यासाठी ओनलाइन नोंदणी आवश्यक आहे. शहरातील तंत्रस्नेही नागरीक नोंदणी करुन खेड्यांमध्ये जाऊन करोनाची लस टोचून घेत आहेत.तर ज्यांना ओनलाइन नोंदणी करता येत नाही किंवा मोबाईल तंत्र हाताळणी करणे अवघड आहे, त्यातच ग्रामीण भागातील ओनलाइन सेवा केंद्र टाळेबंधात असल्याने नोंदणी करण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. असे नागरीक लसीकरणा पासुन वंचित राहण्याची वेळ आली आहे. एक प्रकारे शिक्षित व तंत्रस्नेही नागरीक गोरगरिबांच्या अशिक्षित पणाचा गैर फायदा घेऊन त्यांच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारत आहेत. आरोग्य केंद्र निहाय कसेबसे १०० लस उपलब्ध होते ना होते तोच त्याची नोंदणी शहरी नागरीकांनी केलेली असते. त्यामुळे लसीकरणा साठी बाहेरून येणारे आणि स्थानिक नागरिक असा वाद पेटू लागला आहे. लसीकरण करण्यासाठी शहरी भागातील लोकं चारचाकी वाहने करून गावागावात येत आहेत. ज्यांच्याकडे वाहने उपलब्ध आहेत आणि जे तंत्रस्नेही आहेत त्यांनाच लस मिळत आहे. लसीकरण नोंदणी साठी आधार कार्ड किंवा ज्या- त्या गावातील केंद्रांतर्गत व्यक्तीला त्याचा लाभ व्हावा असे धोरण असायला हवे. लसीची मागणी आणि नाव नोंदणी यामध्ये समन्वय न ठेवल्यास मोठे प्रश्न जन्माला येतील.असे सांगण्यात येत आहे. अलीकडेच बल्लारपूर तालुक्यातील लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या नंतर शहरी भागातील नागरिकांचा कल लसीकरणा साठी ग्रामीण भागाकडे वाढल्याचे निदर्शनास आले. केवळ तंत्रस्नेही आहात म्हणून कोणाला तरी लस लवकर मिळते आहे. ही बाब ग्रामीण भागातील लोकांना वंचित ठेवण्या सारखी आहे. किमान ज्या केंद्रात ज्या गावांसाठी लस दिली जाते. ती त्या गावातील नागरिकांना किंवा परीसरातिल नागरिकांना वापरासाठी उपलब्ध असावी. असा तरी नियम असावा. सध्याच्या एपमुळे पाच मिनिटांत केंद्रात आलेला कोटा संपुष्टात येतो. तो बहुतांशी शहरी नागरीक नोंदणी करुन घेतात. त्यामुळे ग्रामीण व्यक्तीला लस मिळणे अवघड होते आहे. ही बाब शासनाच्या लक्षात आली नसली तरी पुढील गांभीर्य लक्षात घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर त्वरित उपाययोजना कराव्यात.व ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात लसीकरणा संदर्भात समज- गैरसमज निर्माण झाले आहेत. ते दुर करण्यासाठी स्थानिक यंत्रणा च्या माध्यमातून जागृती घडवून आणावी अशी मागणी करण्यात येत आहे.