कटाक्ष:राजकारण लसीचे की हिंदुत्वाचे! जयंत माईणकर
सध्या देशात हिंदुत्वाच्याबरोबरच एक राजकरण सुरू झालं आहे.कोरोनावर दिल्या जाणाऱ्या लसींच्या वाटपाच राजकारण! भाजपशासित राज्यांना गरजेपेक्षा जास्त लसीचा पुरवठा आणि महाराष्ट्रासारख्या भाजपच्या हातून निसटलेल्या राज्यांना त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी कमी लसी दिल्या गेल्या ही वस्तुस्थिती प्रत्येक राज्यांच्या लोकसंख्येकडे आणि त्यांना मिळालेल्या लसींच्या संख्येकडे नजर टाकली तर दृष्टोत्पत्तीस येते. थोडी आकडेवारीकडे नजर टाकल्यास आपल्याला अस लक्षात येईल की देशाच्या १३६ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ९१ कोटी१८ वर्षावरील असून सर्वांना जर ही लस देण्याचा विचार केला तर देशासाठी सुमारे २०० कोटी डोजेस द्यावे लागतील.एक लस करायला अंदाजे २०० ते २५० रुपये खर्च येतो म्हणजे देशातील १८ वर्षावरील सर्वाना लसीचे दोन लसी द्यायला अंदाजे ५००० कोटी रुपये बजेट लागेल. नोटबंदी, जीएसटी मुळे आधीच खिळखिळी झालेली देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमुळे अधिक डबघाईस येणार यात शंकाच नाही. या तुलनेत आपली सध्याची तयारी कुठपर्यंत आली आहे बघूया.आतापर्यंत वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि इतरांना मिळून सुमारे सुमारे ५ कोटी डोजेस देण्यात आले आहेत तर या तुलनेत सुमारे११कोटी डोजेस जगातील ७६ देशांना निर्यात केल्या आहेत. यात पाकिस्तानला मिळालेल्या किंवा येत्या काळात मिळणाऱ्या एकूण साडेचार कोटी डोजेसचाही समावेश आहे. कोरोनवरील औषधांच्या साठेबाजीमध्ये भाजपवर आरोप होणे आणि साठेबाजीचा आरोप असणाऱ्यांच्या तथाकथित संरक्षणासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्वांनी आपली ताकद पणाला लावणे हे कितपत योग्य हाही एक प्रश्नच आहे. बहुतेक औषधी कंपन्या गुजरातमध्ये आहेत हेही येथे उल्लेखनीय!गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांनी तथाकथित रित्या कोरोनवरील ५००० औषधांचा साठा कार्यकर्त्यांसाठी देने ही घटना अनेक प्रश्न निर्माण करतात. कारण या सर्व घटना एक प्रकारची साठेबाजी दर्शवितात. आणि सध्याच्या काळात आशा प्रकारची साठेबाजी अयोग्य आहे.
आपल्या सर्व विरोधकांना देशद्रोही किंवा पाकधार्जिणे म्हणणारा भाजप स्वतः केंद्रात सत्तेत असताना पाकिस्तानला लसी कशा पुरवू शकतो ?. संघाच्या प्रत्येक शाखेत महात्मा गांधींनी १९४७ साली पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देऊन किती मोठी चूक केली अस तथाकथित रित्या स्वयंसेवकांना सांगितल जात.पण अशा संघाच्या मुशीतून तयार झालेले मोदी शहा सत्तेवर असताना पाकिस्तानला
साडेचार कोटी लस पुरवणं संघ परिवार कशा प्रकारे स्वीकारेल हाही एक प्रश्नच आहे.
मोदी आणि भाजपकडे दूरदृष्टीचा संपूर्ण अभाव आहे असं जाणवत. गेल्या वर्षारंभी राहुल गांधींनी कोरोनाच्या येऊ घातलेल्या धोक्याची कल्पना दिली होती.पण त्यावेळी आपले पंतप्रधान नमस्ते ट्रम्प म्हणत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत अहमदाबाद मध्ये करत होते आणि त्यानंतर लगेच मध्य प्रदेशातील जवळपास २२काँग्रेस आमदारांचे राजीनामे तथाकथित रित्या प्रत्येकी २५ कोटी रुपयांच्या बदल्यात घेऊन शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री केल्यानंतरच देशातला लॉकडाउन सुरू झाला. म्हणजे लोकांच्या सुरक्षिततेपेक्षा ट्रम्प यांचं स्वागत आणि मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडणं महत्त्वाचं होत. या वर्षाच्या सुरुवातीलाच ज्यांना भाजपने पप्पू म्हणून हिणवले त्या राहुल गांधींनीच भारताने गरज पडल्यास परदेशातून लस आयात करावी असा सल्ला दिला. त्यावेळी राहुल गांधींना लस आयात करा असा सल्ला देण्याच्या बदल्यात कमिशन मिळालं असावं ते परकीय औषध कम्पनीला मदत करत असल्याचा आरोप करेपर्यंत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची मजल गेली होती. आणि काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने परदेशातून लसी आयात करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घटनांत राहुल गांधींची दूरदृष्टी दिसते ज्याचा भाजपच्या सर्व नेत्यांमध्ये अभाव आहे.मग देशातील जनतेची खरी काळजी कोण घेत आहेत. ज्यांना पप्पू म्हणून हिणवले ते राहुल गांधी की स्वतःच्या पत्नीचं नाव लिहायला विसरणारे नरेंद्र मोदी? एकूणच या कोरोना प्रकरणात मोदी किती बेजबाबदारपणे वागले आहेत आणि त्याचा जनतेला किती मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे हे दिसत आहे.
अगदी आत्ताही राहुल गांधींनी कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे बंगालमधील प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आणि इतरही राजकीय पक्षांनी तसाच निर्णय घ्यावा असे आवाहन केलं. बंगाल आपल्या हातात आणण्यासाठी जातीय दंगलीपासून, नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर या सर्वांचा आधार घेणारे नरेंद्र मोदी या आवाहनाला काय प्रतिसाद देतील हे वेगळं विचारण्याची गरज नाही. लोकांच्या सुरक्षिततेपेक्षा या पक्षाला सत्ता महत्त्वाची हे चित्र केव्हाच स्पष्ट दिसत आहे. म्हणजे इथेही राहुल गांधींचीच परिपक्वता दिसत आहे. तिकडे ब्राझीलने कोरोनाकाळात स्त्रियांनी गर्भधारणा टाळावी असा सल्ला दिला आहे. आपल्याकडे केंद्रातील सत्ताधारी, ‘चड्डीधारी’ अशी परिपकवता दाखवण्याची सुतराम शक्यता नाही.
देशातील पारंपरिक साथीच्या रोगांचे समूळ उच्चाटन गेल्या सत्तर वर्षांत झाले. पोलिओ, देवी, गोवर या रोगांवरील लसी शोधल्या गेल्या.वाढत्या लोकसंख्येला त्या लसी चिकाटीने पुरवल्या गेल्या आणि त्या रोगांवर विजय मिळवला गेला. नेहरु, इंदिराजी,राजीवजी, नरसिंह राव या सर्वांचीच सरकारे या कार्यासाठी गंभीर होती. त्यात हाफकिन प्रयोगशाळेचे पण मोठे योगदान आहे.कोणत्याही सरकारने रोग निर्मुलनाचा राजकीय फायदा कधीच घेतला नाही. त्या त्या सरकारने ती जबाबदारीच मानली
कोविदवरील ; लस जरी भारतात तयार होत असली तरी त्याला लागणारा कच्चा माल, बरचस तंत्रज्ञान अमेरिकेतून , युरोपातून येतं. आणि अमेरिकेने ती रसायने इतर देशांना निर्यात करायला बंदी घातली आहे.खरेतर आमच्या सर्वोच्च राजकीय नेत्यांनी अमेरिकेबरोबर हा वाटाघाटींचा मुद्दा केला पाहिजे .पण या महाशयांना बंगालमधली विधानसभा निवडणुक जास्त महत्त्वाची!
मोदी आणि त्यांची भक्त मंडळी देशातील कुठल्याही तथाकथित चुकीच्या घटनेबद्दल नेहरू गांधी परिवारवर दोषारोपण करतात.कोरोना लस नेहरूंनी शोधली नाही म्हणून शिव्याशाप दिले नाहीत हे नेहरूंचे नशीब! नाहीतरी देशापुढील प्रत्येक प्रश्नाला फक्त नेहरूच जबाबदार आहेत असं गेली कित्येक वर्षे बिंबवले जात आहे.
कुंभ मेळ्याला परवानगी देण्यात या सरकारने फार मोठी चूक केली आहे. शेवटी त्यामागे कारण आपली हिंदुत्वाची वोट बँक शाबूत ठेवावी हेच आहे. मरकज साठी जमलेल्या एक हजारहुन जास्त ताब्लिगी जमातीच्या लोकांनी कोरोना पसरविला म्हणून हंगामा करणाऱ्या भाजपला कुंभ मेळ्यातील मास्क न घातलेले नग्न साधू आणि त्यांच्यामुळे पसरणारा कोरोना दिसत नाही. पण अर्थात भाजपचं हे आंधळेपण अपेक्षितच आहे.
..यावर्षी कुंभमेळ्याबरोबरच आसाम आणि बंगालची निवडणूक भाजपला महत्त्वाची. बिहार निवडणुकीत मोदींनी आश्वासन दिलं होतं सर्वांचे फुकट लसीकरण करणार म्हणून. अर्थात इतर घोषणांप्रमाणे ही घोषणाही हवेतच विरली.
आपल्या पक्षाचं शासन नसलेल्या राज्यांना केंद्राकडून मदत देताना त्रास देण्याचं धोरण केंद्रातील भाजप सरकारने अवलंबिलेलं दिसत आहे. संघराज्य पद्धतीत केंद्राने राज्याला अशा प्रकारची सापत्न वागणूक देणं घातक असत. पण देशभर केवळ आपल्याच पक्षाचं राज्य असावं आणि आपल्याला कोणीही विरोधक नसावा या ‘अतिरेकी हिंदुत्ववादी’ संकल्पनेने भारलेल्या भाजपच्या सत्तापिपासू नेत्यांना येनकेनप्रकारेन फक्त आपल्या पक्षाची सत्ता हवी. त्यासाठी ते १२ आमदारांची विधान परिषदेवरील नियुक्ती रोखु शकतात, महाराष्ट्राला गरजेपेक्षा कमी लसींच्या पुरवठा करू शकतात.सत्तेवर येण्यासाठी बाबरी मस्जिद पडण्यापासून तर गोध्रा दंगलीपर्यंत रक्ताच्या पायघड्या घालणाऱ्या पक्षाला यात नवीन काहीच नाही. तूर्तास इतकेच!
..