तलाठी साजा धानोरा परिसरात रेती चोरट्यांचा धुमाकूळ
रेती तस्करांचा महसूल कर्मचाऱ्यांना एवढा पुळका का?
राजुरा, अमोल राऊत (१२ मार्च) : राजुरा तालुक्यातील तलाठी साजा धानोरा अंतर्गत येणाऱ्या सिंधी, कविटपेठ, चिंचोली (बु.) परिसरातील नाल्यावर रेती चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याची खात्रीलायक माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या डोळ्यादेखत रेतीची चोरटी वाहतूक होत असतांना स्थानिक कर्मचाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. यामुळे रेती तस्करांचा एवढा पुळका का? असा प्रश्न जनसमान्यात चर्चिला जात आहे.
स्थानिक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाण्यामुळे रेती चोरट्यांनी कंबर कसली कि काय? अशा शंकेला जनतेत तोंड फुटले आहे. महसूल प्रशासनाच्या निदर्शनास हि बाब आणून दिल्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई होतांना दिसत नसून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी थातुरमातुर कारवाई केली जाते. मागील तहसीलदार यांच्या कार्यकाळात रेती तस्करांवर होणाऱ्या ठोस कारवाईमुळे रेती तस्करांची चांगलेच धाबे दणाणले होते. मात्र सद्या परिस्थितीत महसूल प्रशासनाच्या उदास धोरणामुळे रेती चोरट्यांना मोकळे रान मिळाल्याचे दिसून येत आहे.
सदर रेती तस्करीविषयी धानोरा साजा येथील तलाठी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. या ढीसाळपणामुळे रेती चोरटे महसूल प्रशासनावरच भारी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिक कर्मचाऱ्यांच्याच आशीर्वादाने शासकीय महसुलाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
अशा कर्मचाऱ्यांवर महसूल प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.