आमदार जोरगेवारांच्या प्रयत्नांना आले यश, ३ बंधा-यांसाठी १० कोटीचा निधी झाला मंजूर
चंद्रपूर।किरण घाटे
शहरातील पाणी टंचाई तसेच शेतक-यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे याकरीता येथून वाहणा-या नदी नाल्यांवर गेटेड साठवण बंधा-यांची निर्मीती करण्यात यावी या करीता आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु होते. त्यांच्या पर्यत्नांना यश आले असून सदर तिन बंधा-यांसाठी जलसंधारण विशेष निधी अंतर्गत १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
चंद्रपूरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी ज्वलंत होत असतो. तसेच शेतक-यांनाही शेती करीता मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसते. ही बाब लक्षात घेता उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांचा योग्य उपयोग करुन पाण्याची गरज भागविण्यासाठी येथील नदी नाल्यांवर गेटेड साठवण बंधा-यांचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली होती.
या बाबत जलसंधारण मंत्री जयंती पाटील यांना निवेदनही देण्यात आले होते. याचा पाठपूरावाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने सुरु होता. या पाठपूराव्याला अखेर यश आले आहे. सदर बंधा-यांच्या निर्मीतीसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या कामाची निविदाही प्रकाशीत करण्यात आली आहे. जलसंधारण विशेष निधी अंतर्गत हे काम केल्या जाणार असून या अंतर्गत जुनी पडोली येथील ईरइ नदी, अंतुर्ला येथील स्थानिक नाला व विचोडा रयतवारी येथील इरई नदीवर या गेटेड साठवण बंधा-यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या बंधा-यांच्या निमिर्तीनंतर येथे पाण्याची साठवण केल्या जाणार असून या पाण्याचा उपयोग शेतीसह इतर कामासाठी केल्या जाणार आहे. तसेच या बंधा-यांमूळे सदर भागातील जमीनीतील पाणी पातळी वाढविण्यातही मोठी मदत होणार आहे.