चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

0
751

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरिता कटिबद्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्याचा निर्णय

जिल्ह्यातील 53,336 शेतकऱ्यांना 312 कोटी 44 लाख रुपये कर्ज माफी

पर्यटनाला चालना देण्यासाठी पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याचा निर्धार

नवीन पुनर्वसन धोरण आणणार

मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 26 : बहुजनांचे कल्याणासाठी महाविकास आघाडी शासन सदैव तत्पर आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्वानुसार सरकार काम करत आहे. यापुढेही असेच लोककल्याणकारी काम सुरू राहील. चंद्रपूर जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी समतोल विकासाची हमी देत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, खार जमीन विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांच्यासह प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त झालेले मान्यवर, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर व सामान्य नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतांना जिल्ह्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण ठेवले. कोरोना प्रतिबंधासाठी जंबो उपचार सुविधांची निर्मिती करून आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यात पूरग्रस्तांना तातडीने मदत केली. या पुरग्रस्त भागासाठी शासनातर्फे त्वरीत 42 कोटीची मदत मंजूर करून त्यातील 36 कोटी मदत वाटप करण्यात आली आहे. ‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती’ योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 53 हजार 336 शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या खात्यांवर कर्जमाफीची 312 कोटी 44 लाख रुपये रकम जमा करण्यात आली आहे. या खरीप हंगामात विविध बँकेच्या माध्यमातून 1 लाख 4 हजार 164 शेतकऱ्यांना 755.64 कोटी रुपयाचे खरीप पीक कर्ज वाटप झाले आहे. गरीब व गरजू नागरिकांना पोट भरण्यासाठी जिल्ह्यातील 22 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून सुमारे 6 लाख शिवभोजन थाळी केवळ पाच रुपये दरात उपलबध करून देण्यात आली. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अतिरिक्त 700 रुपये बोनस देणारे महाराष्ट्राचे महाविकास आघाडी शासन, हे देशातील एकमेव सरकार आहे. याचा थेट फायदा चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. जिल्ह्यात एकूण 59 केंद्रावरून आतापर्यंत 4 लाख 37 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
बचत गटांना कर्ज वाटपामध्ये चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. तसेच पोषण अभियानामध्ये उत्तम काम करीत तब्बल पाच हजार परसबागांची निर्मिती केली आहे.
जगाच्या नकाशात चंद्रपूरचे नाव ताडोबा पर्यटनाच्या माध्यमातून झळकते. देशी-विदेशी पर्यटक भेटीवर येतात. येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी ताज गृप बरोबर करार करून पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला असून महेन्द्रा क्लब, लि-मेरीडीअन, रेडीसन ब्ल्यू यासारखी पंचतारांकीत हॉटेल्स या भागात येवू पाहत आहेत. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून महसूल व स्थानिकांना रोजगाराच्या संधी वाढतील असेही पालकमंत्री यांनी सांगितले
महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला, त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 जाहीर केले असल्याचे सांगतांना या धोरणानुसार कृषी पंप ग्राहकांना विज बिलात सवलत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असल्याचेही ते म्हणाले. तसेच भरणा केलेल्या रकमेच्या 33 टक्के रकम, संबंधीत ग्रामपंचायतीला, आणि 33 टक्के रकम, ही जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकांच्या पायाभुत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापल्या जाणार आहे.
नव्याने घोषित झालेल्या कृषी पायाभूत निधी योजनेअंतर्गत गोडावून, पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, सेंद्रिय खताचे उत्पादन इ. प्रस्तावांचे कर्ज-व्याज दरात तीन टक्के सवलत दिली आहे.
गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. प्रकल्पाचे काम लवकर पुर्ण व्हावे म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकल्पाकरिता एक हजार कोटी व्यतिरिक्त अधिकचे 500 कोटी म्हणजे दरवर्षी दिड कोटी रुपये देण्यास सहमती दर्शविली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील 40 ते 50 वर्षापासून पुनर्वसन धोरण नव्हते ते नवीन धोरण आणण्याचा निर्धार माझ्या शासनाने केला आहे. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी महाज्योतिची स्थापना करण्यात आली असून त्याचे माध्यमातून 20 हजार विद्यार्थ्यांना जे.ई.ई., ए.ई.ई.ई. व एन.ई.ई.टी साठी तसेच युपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी 500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी दोन ओ.बी.सी. वस्तीगृह बांधण्यात येणार आहे. तसेच या मागास प्रवर्गातील 60 विद्यार्थ्यांना व्यावसायीक वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यासाठी संबंधीत कंपन्यांशी करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी आणि देखणी इमारत उभी करण्याचा तसेच जिल्ह्यातील 400 अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
2020 या आपत्तीच्या वर्षात आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुर्नवसन मंत्री म्हणून मोठ्या प्रमाणात काम करता आले. पाऊस, पुर, अतिवृष्टी, चक्रीवादळ इत्यादी सर्व आपत्तीच्या ठिकाणी सामान्य माणसाच्या पाठिशी मी जातीने हजर असल्याचे त्यांनी सांगितले. संकटकाळी नागरिकांना मदत करता आली, लोकांच्या जवळ जाता आले. तसेच बहुजन कल्याण खात्याचा मंत्री म्हणून बहुजन समाजाच्या तरुणांसाठी महत्वाचे व ठोस निर्णय घेता आले. या सर्व कामातून सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची मला संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सुरवातीला पालकमंत्री यांनी भारतीय संविधानामधील उद्देशिकेचे वाचन केले. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत पुरस्कार देण्यात आले.
जिल्हा पोलीस दलातील एएसआय लिलेश्वर वऱ्हाडमारे व विजय बोरीकर यांना गुणवत्ता सेवा पदक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचलन मोंटू सिंग व मंगला घागी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here