चंद्रपूर मधील सामाजिक कार्यकर्ते स्व. मोहन हिराबाई हिरालाल यांच्या जीवनावर महाराष्ट्रातील विविध पर्यावरणीय, सामाजिक आणि सर्वोदय कार्यकर्त्यांनी वेगवेगळे लेख लिहून ‘स्वराज्य यात्रिक’ या पुस्तकाच्या वतीने त्यांना स्मरनांजली वाहिली. काल श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर येथे स्वराज्य यात्रिक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विचार मंचावर लोकसत्ता वर्तमानपत्राचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे भाष्यकार म्हणून तर सौं. शुभदा देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय मोहन हिराबाई हिरालाल यांच्या पत्नी श्रीमती सविता तारे, चंद्रपूर मधील सामाजिक कार्यकर्ते किशोर जामदार यांचीही विचार पिठावर उपस्थिती होती.
मोहन हिराबाई हिरालाल यांच्या जीवनावरील २६ विविध लेख तसेच मोहन हिराबाई हिरालाल यांची स्वतःचे ४ लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. स्व. मोहन यांचे बालपण, स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातील त्यांचे दिवस, जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा दिलेला नारा आणि त्यामध्ये समाविष्ट झालेले भारतातील १९८० च्या दशकातील तरुण आणी त्यांचे कार्य, महाराष्ट्राच्या मेंढा लेखा या गावातील ग्राम स्वराज्याची चळवळ, स्व. मोहन यांनी ग्रामदानासाठी शेवटपर्यंत केलेले प्रयत्न असे विविध पैलू या पुस्तकात समाविष्ट आहेत. ही पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मुख्य भाष्यकार लोकसत्ता नागपूरचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे असे म्हणाले की माझे गडचिरोली जिल्ह्यात बालपण गेल्यामुळे येथील पर्यावरणीय चळवळी बद्दल मला आपसुकता होती. मोहन भाऊमुळेच माझे पत्रकारिता जीवन बहरले, मी मोहन भाऊंना ‘सामान्यांतील असामान्य माणूस’ असेच म्हणेल. त्यांनी सरकार नावाच्या एका अजस्त्र यंत्रनेशी अनेक वर्षांपर्यंत यशस्वी लढा दिला आहे आणि हा लढा देताना त्यांनी गांधीजींचे अहिंसा हे धोरण अवलंबिले, जीवनभर एकदाही हिंसा न करता मोहन भाऊंनी गडचिरोलीच्या आदिवासींना जो विजय मिळवून दिला तो प्रचंड मोठा आहे आणि इतरांना प्रेरणा देणारा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या गडचिरोली जिल्ह्यातील संघटनेच्या प्रतिनिधी सौ शुभदा देशमुख यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून होत्या. मोहन हिराबाई हिरालाल यांच्यामुळे आमच्याही जीवनात फार बदल झाला, असे त्या अध्यक्षीय भाषणातून बोलल्या. आदिवासी भागात स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात त्यांना कुर्मा घराची गरज असते, मोहन च्या मदतीने आम्ही अशा घरांची डिझाईन तयार करू शकलो. हे घर फक्त मासिक पाळीच्या काळातच नसून कौटुंबिक वादाचे वेळी सुद्धा उपयोगात आणले गेले असेही त्या म्हणाल्या. मंचावरून मोहन हिराबाई हिरालाल यांच्या पत्नी सविता तारे बोलताना गहिवरून गेल्यात, स्व. मोहनच्या सोबत घालवलेले दिवस आठवायचा प्रयत्न त्यांनी केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किशोर जामदार यांनी केले आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्व. मोहनने चंद्रपूर गडचिरोली परिसरात केलेल्या कार्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. योगेश दूधपचारे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला चंद्रपुरातील गणमान्य व्यक्ती, सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्ते, उपस्थित होते.









