तेलंगानातुन आलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू
नातेवाईक अनुपस्थित., मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित
चंद्रपूर २४ जुलै – तेलंगाना राज्यातून 21 जुलै रोजी एक महिला चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. पॉझिटिव्ह स्वॅब आलेल्या या महिलेचा शर्थीच्या वैद्यकीय उपचारानंतर 24 जुलैच्या पहाटे 2.30 वाजता मृत्यू झाला. मात्र अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक अनुपस्थित असल्याने कोरोनाबाधितेच्या मृतदेहांवर महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार याची पूर्वकल्पना अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती, त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली होती, अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक समोर न आल्याने शेवटी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार विधी पार पाडला.
कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाउन करण्यात आले. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध करण्यास कसोशीने प्रयत्न सुरु केले. रुग्ण तात्काळ सापडण्यास चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली, तातडीने वैद्यकीय उपचार मिळावा याचे नियोजन करण्यात आले.
सदर महिला ही तेलंगाना राज्यातून 21 जुलै रोजी चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. 21 जुलै रोजी दाखल केलेल्या महिलेला श्वसनासंदर्भातील समस्या होती. तसेच ही महिला उच्चरक्तदाबाची देखील रुग्ण होती. खाजगी रुग्णालयात असताना या महिलेचा स्वॅब 22 जुलै रोजी घेण्यात आला. या नमुन्यांचा अहवाल 23 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. 23 जुलैच्या रात्री 12.59च्या सुमारास ( 24 जुलैला )या महिलेला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र 24 जुलैच्या पहाटे 2.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
यांचा मूळ पत्ता तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ या गावाचा आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद त्यांच्या मृत्यूची नोंद आदिलाबाद तेलंगणा येथे होणार असल्याचे शिळा प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे
रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक पुढे न येणं व महानगपालिकेचा आधार मिळणे ही वस्तुस्थिती यानिमित्ताने दिसून आली आहे.