राजुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक!
१.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त – ६ जुगारी जेरबंद, एक फरार
राजुरा:अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून आता थेट जुगार अड्ड्यांवरच सर्जिकल स्ट्राईक सुरू झाली आहे. २७ मार्चच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास राजुरा पोलिसांनी बामनवाडा परिसरात धाड टाकत जुगार खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल १ लाख ९३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६ जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बामनवाडा येथे धडक दिली. महेंद्र पाल यांच्या पानठेल्याच्या मागील बाजूस सुरू असलेला हा जुगार अड्डा पोलिसांनी अक्षरशः उद्ध्वस्त केला. धाड पडताच काहींमध्ये धांदल उडाली, तर काही जण पत्त्यांसह पकडले गेले.
या कारवाईत महेंद्र महादेव पाल(३४), प्रफुल गणपतराव चौधरी(४८), पवन महेश पोतुलवार(२६),रुपेश भाऊराव येलमुले(३४), संकेत विश्वजित नगराले(२३) आणि शिलवंत भैय्याजी टिपले(३८) यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, पोलिसांचा ससेमिरा पाहताच योगेश केसगिरे हा आरोपी पळ काढण्यात यशस्वी ठरला असून त्याचा शोध सुरू आहे.
झडतीदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, ताशाचे पत्ते आणि दोन दुचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली विक्की निर्वाण व सहकारी यांच्या मार्फत तपास सुरू आहे.








