शहरात सुगंधित तंबाखू व अवैध दारू विक्रीला ऊत ; पोलीस प्रशासनाचे मौन व्रत संशयास्पद
राजुरा । अमोल राऊत : शहरात ठिकठिकाणी सुगंधित तंबाखू विक्री तसेच अवैध दारू विक्रीला बराच ऊत आल्याचे चित्र दिसत असून याकडे पोलीस प्रशासनाचे मौन व्रतामुळे विविध चर्चेला उधाण आल्याचे निदर्शनास येत आहे.
सुगंधित तंबाखू व दारू विक्रीला बंदी असतानाही तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध विक्रीमुळे प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉकडाउन काळात छोटे व्यावसायिक हतबल झाले आहेत. मात्र सुगंधित तंबाखूची मोठया व्यावसायिकांकडून खुलेआम विक्री होत असल्यामुळे मोठे मासे गळाबाहेर कसे काय ? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
दारूबंदी असतानाही शहरात दारूचा मुबलक पुरवठा होत असल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
सुगंधित तंबाखू व दारू मुळे अनेक कुटुंबे उघडयावर पडली असून जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडण्यात आल्याचे दिसून येत आहे. अवैध दारू विक्री व सुगंधित तंबाखू विक्रीवर आळा घालण्यासाठी अन्न व पुरवठा विभाग तसेच पोलीस प्रशासन कडून कोणते पाऊले उचचली जातील याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.