दत्तक सप्ताह निमित्य बालकांच्या संगोपनावर प्रशिक्षण
किलबिल दत्तक संस्थेचा उपक्रम
चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर : 14 ते 21 नोव्हेंबर हा सप्ताह दत्तक जाणीव जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहादरम्यान दत्तक विधान संस्थांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात. या दत्तक सप्ताहाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला विकास मंडळ द्वारा संचालित चाईल्ड लाईन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांसाठी कार्यरत आया (काळजीवाहक) यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था येथील सभागृहात कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे, महिला विकास मंडळाच्या संचालिका प्रभावती मुठाळ, चाईल्ड लाईन,चंद्रपूरच्या संचालिका नंदाताई अल्लुरवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका साधना मेश्राम, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी सध्यस्थितीत अनाथ मुलांच्या संगोपनासाठी दत्तक प्रक्रिया चांगला मार्ग ठरत असल्याचे सांगून मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या पायऱ्या, प्रक्रिया, अटी व नियम याबाबीवर मार्गदर्शन केले.
अपत्यहिन लोकांना दत्तक विधानाने दत्तक घेण्याचा अधिकार आहे, स्वत:बरोबर दत्तक घेतलेल्या मुलाचेही जीवन सुखी, आनंदी होत असते तसेच बालगृह दत्तक संस्थेच्या माध्यमातुन दत्तक प्रक्रिया समजावून सांगितली जाते. अशी माहीती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी यावेळी दिली.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका साधना मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनातून गंभीरपणे दोषारोपण (एसएएम) सॅम आणि मध्यम आकाराचे कुपोषण (एमएएम) मॅम याबाबत मार्गदर्शन करून आयांना, बालकांना सांभाळताना येणाऱ्या समस्येवर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी, आउट रिच वर्कर तेजस्विनी सातपुते, चाईल्ड लाईन चंद्रपूरचे समन्वयक अमोल मोरे व त्यांच्या चमूने उस्फुर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय साखरकर यांनी केले तर आभार किलबिल दत्तक संस्थेचे अधीक्षक हेमंत कोठारे यांनी मानले.
जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूरच्या वतीने दि. 14 नोव्हेंबर 2020 रोजी अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पंधरवाडा जिल्ह्यात आयोजित केला आहे. त्या संदर्भात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर येथे कक्ष स्थापित करण्यात आले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथील परिविक्षा अधिकारी श्री. गाडगे, संरक्षण अधिकारी संस्थात्मक प्रीती उंदीरवाडे, संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य राजेश भीवदरे तसेच समुपदेशक प्रिया पिंपळशेंडे उपस्थित होते. सदर कक्षामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.