महिला सक्षमतेची ज्योत, गडकिल्ल्यांचा गौरव – श्रीतेज प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम
गडचांदूर : कौटुंबिक रचनेतील मुख्य आधार असलेल्या मातृशक्तीच्या कलागुणांना वाव मिळावा आणि भारतीय वारसा जपण्यासाठी श्रीतेज प्रतिष्ठान, गडचांदूरतर्फे “महिला सशक्तीकरण कार्यशाळा”, “गडकिल्ले प्रदर्शनी” आणि “श्रीतेज खाद्य महोत्सव” आयोजित करण्यात आले. हा उपक्रम स्थानीय महात्मा गांधी विद्यालयात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राजुरा उपविभागीय अधिकारी कु. कश्मीरा संख्ये (भा.प्र.से) यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भाष्य करताना सांगितले की, “खडतर प्रवासातून मार्गक्रमण करणाऱ्या महिला अधिक यशस्वी होतात. कठीण प्रसंगी आपल्या अवतीभोवती असलेल्या संघर्षशील महिला प्रेरणादायी ठरतात.” तसेच, त्यांच्या भाषणानंतर महिला सहभागींसोबत प्रश्नोत्तर व चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यशाळेत पर्यावरण शास्त्रज्ञ सौ. रत्ना पंड्या आणि श्री. सोहम पंड्या (वर्धा) यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी अंबाडीच्या भाजीचे विविध उपयोग सांगत, महिलांनी सामाजिक कार्य करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी होण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमात कु. कश्मीरा संख्ये, शास्त्रज्ञ सौ. रत्ना पंड्या आणि श्री. सोहम पंड्या यांच्या कार्याबद्दल श्रीतेज प्रतिष्ठानतर्फे ‘कर्तृत्व गौरव’ करण्यात आले. तसेच, स्मिता अनिल चिताडे, डॉ. शारदा येरमे, स्नेहल उपरे, स्वेता येरेकर आणि संगीता पोहणकर यांना प्रतिष्ठानतर्फे “प्रेरणादायी महिला” म्हणून विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश ताजने यांनी केले.
गडकिल्ले प्रदर्शन स्पर्धेत ३६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी गडचांदूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. यमाजी धुमाळ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गडकिल्ले प्रदर्शनी आणि खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी श्रीतेज प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
तसेच, महिला बचत गटाच्या सहभागामुळे “श्रीतेज खाद्य महोत्सवाला” उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये ३० स्टॉल्स लावण्यात आले होते, जिथे परंपरागत व नव्या चवींचे स्वादिष्ट पदार्थ नागरिकांना चाखायला मिळाले.
कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी “चिमूर का छोकरा” नावाने प्रसिद्ध यूट्यूबर श्री. आशिष बोबडे यांनी उपस्थित नागरिकांना विविध विनोदी किस्से सांगून हास्यकल्लोळ निर्माण केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कोंडबत्तूलवार आणि खरवडे सर यांनी केले. गडचांदूर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच स्थानीय नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.