सीसीआयची बंद कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा!
आमदार देवराव भोंगळे यांची मंत्री जयकुमार रावल यांचेकडे मागणी
राजुरा, दि. ०५ :- चंद्रपुर जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) चे कापुस खरेदी केंद्रे मुदतीआधीच अचानक बंद करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना आपला कापुस खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने विक्री करावा लागत आहे. त्यामुळे सीसीआयकडून बंद करण्यात आलेली कापुस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी मागणी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांचेकडे निवेदन देऊन केली आहे.
विदर्भ हा महाराष्ट्रातील ३०% कापूस उत्पादन करणारा प्रमुख प्रदेश असून विशेषतः राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कापुस उत्पादन होते. परंतू सीसीआयने आपली कापुस खरेदी केंद्रे बंद केली असल्याने ७ हजार ४२० रूपये प्रती क्विंटल सरकारी हमीभावापेक्षा ६ हजार ८०० इतक्या कमी दराने शेतकऱ्यांना आपला कापुस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून योग्य पर्यायाअभावी अजुनही हजारो शेतकऱ्यांच्या घरात विक्रीविना कापूस पडून आहे.
त्यासाठी शासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून सीसीआयने बंद केलेली कापुस खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू करावी अशी मागणी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांना निवेदन देत केली आहे.