महामिनरल मायनिंग कंपनीने स्थानिकांच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात – आमदार किशोर जोरगेवार

0
18

महामिनरल मायनिंग कंपनीने स्थानिकांच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात – आमदार किशोर जोरगेवार

गावकऱ्यांमध्ये रोष, शिष्टमंडळाने भेट घेऊन दिले निवेदन

उसगाव लगतच्या महामिनरल मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यप्रणाली मुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कंपनीच्या कामकाजामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने आणि गावकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेतली असून, आमदार किशोर जोरगेवार यांचे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे. यावेळी उसगाव ग्रामपंचायत सरपंच निविता ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुरकर, सदस्य यमुना राजुरकर, रेखा कोडापे, वर्षा बोंदरे, धनंजय ठाकरे, रमेश काळे, कवडू ठोबरे, मोहनदास राजुरकर, दिलीप ठाकरे, उसगाव पोलिस पाटील नरेंद्र बुच्चे, इमरान खान, संजय तिवारी, निरिक्षण तांडा, संतोष नुने, मिन्टु कलवल, पसी गादे, विशाल अड्डूर, इमरान खान, स्वप्निल वाढई, नंदकिशोर यादव, विजय कपूर, सागर रामटेके, रमन तांडा, महेश लठ्ठा, मयुर कलवल, राहुल चुपाका,सागर गेडाम, उदय कलवल, अरुण दाभेरे, हेमराज बोबडे, यांची उपस्थिती होती.
कंपनीच्या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे रस्ते गावकऱ्यांच्या दैनंदिन रहदारीसाठी असून, कंपनीने त्वरित त्यांची डागडुजी करावी तसेच अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग तयार करावा. कंपनीतून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे आणि कोळसा वॉशरीजमधून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि इतर रहिवाशांना श्वसनासंबंधी आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. कंपनीच्या प्रदूषणामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. म्हणून, कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावीत. त्याचप्रमाणे, या निधीच्या माध्यमातून गावातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांवर भर द्यावा. ग्रामपंचायतीकडे प्रलंबित असलेला कर तातडीने भरावा, अशा सूचनाही निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत.
कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच नुकसानभरपाई वाढवावी, अशी मागणीही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच गावकऱ्यांच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे स्थानिकांना प्राथमिकता देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावर येत्या 10 दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने शिष्टमंडळाला देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here