कठोर परिश्रम हीच उज्वल भविष्याच्या यशाची चावी- आमदार विजय वडेट्टीवार
बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात वार्षिकोत्सव कार्यक्रम
चंद्रपूर : आयुष्यात आपल्याला यशाचे उंच शिखर गाठायचे असेल तर अनेक अडथळे व संकटांना तोंड देत मार्गक्रमण करावे लागेल. नशीबावर कुणीही अवलंबून राहु नका तुमच्या हस्तरेखा मिटु शकतात मात्र कर्तृत्ववाचा ठसा कुणीही मिटवू शकत नाही. यश सहजासहजी मिळत नसते. त्यामुळे तुम्ही बौध्दिक कष्ट उपसण्याची तयारी ठेवा. कारण कठोर परिश्रम हेच उज्वल भविष्याच्या यशाची चावी आहे असे बहुमोल विचार महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
ब्रम्हपूरी तालुक्यातील बेटाळा येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात वार्षिकोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यंग इंजिनिअर्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.देवेंद्र पिसे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद माजी गटनेते विलास विखार, कृउबा संचालक प्रशांत उराडे, यंग इंजिनिअर्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या तथा आयटीआय प्राचार्या निता पीसे, प्राचार्य डॉ.सचिन दुधे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सलग तिसऱ्यांदा ब्रम्हपुरी क्षेत्रातून निवडूण आल्याबद्दल आ. विजय वडेट्टीवार यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कौशल्याचा विकास व्हावा सोबतच शारिरीक दृष्ट्या विद्यार्थी सुदृढ व्हावे यासाठी हा वार्षिकोत्सव महत्वपूर्ण आहे. संस्थेने ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली आहे. ब्रम्हपूरीच नाव उंचाविण्याचे काम आपण विद्यार्थ्यांनी करावे असेही यावेळी सांगितले. सोबतच कवी सुरेश भटांच्या प्रेरणा देणाऱ्या ओवी सांगून उपस्थीत विदयार्थ्यांना आयुष्यात यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सचिन दुधे यांनी सुत्रसंचलन पल्लवी ठुनकुले यांनी केले. आभार पुजा घुटके यांनी मानले.