फलंदाज रविंद्र जाधवचा विश्वविक्रम
एकाच डावात लगावले २८ षटकार
पुणे, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५
क्रिकेट विश्वात एक नवीन विक्रम घडला आहे. एका डावात तब्बल २८ षटकार मारण्याचा विक्रम पुण्याचा खेळाडू रविंद्र जाधव याने केला आहे. धानोरीतील किंग्ज स्पोर्टस क्लब मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा विक्रम रविंद्रने मोडला.निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत दोन दिवसीय (ता.२४-२५) नॉर्थ झोन विरूद्ध युनायटेड क्लब च्या सामन्यात फलंदाजी करीत रविंद्रने एका डावात २८ षटकार आणि १७ चौकार लगावत २७८ धावांची खेळी खेळली. रविंद्रच्या खेळीमुळे यूनायटेड ची स्थिती भक्कम झाली. याच खेळीच्या आधारे यूनायटेडने एक डाव आणि १३८ धावांनी सामना जिंकला.
काही वर्षांपूर्वी पुण्याचा फलंदाज प्रीतम पाटील यांने एकाच डावात २६ षटकार लगावत विक्रम रचला होता. प्रीतमचा हा विक्रम रविंद्रने मोडीस काढला.रविंद्रच्या विक्रमी खेळीसाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.अशा खेळाडूंची दखल क्रिकेट विश्वात सर्वच स्तरातून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.आयपीएल मध्ये रविंद्रला संधी मिळावी, असे देखील पाटील म्हणाले.आयपीएल दर्जाचा खेळ खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना आजही संधी मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.अशात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक, निवडक यांनी अशा ‘टॅलेन्ट’ला हेरून त्यांना आणखी मोठे व्यासपीठ उपलब्ध करवून देत त्यांच्या खेळाला न्याय मिळवून देण्याची मागणी पाटील यांनी यानिमित्ताने केली आहे.