वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू…
राजुरा, २६ फेब्रु. :- तालुक्यातील चुनाळा येथील तीन युवक वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आहे. वर्धा नदीच्या चुनाळा घाटावरील दुपारची ही घटना असून राजुरा आणि बल्लारपूर तालुक्यांच्या सीमेवरून वाहत असलेल्या वर्धा नदीपात्रात ही घटना घडली आहे. महाशिवरात्री निमित्त गावातील काही लोकं नदी घाटावर अंघोळीसाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. मात्र बुडालेले तिन्ही तरुण नदीच्या दुसऱ्या काठावर आंघोळीसाठी गेले आणि त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल असलेल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तुषार शालिक आत्राम (वय १६ वर्ष), मंगेश बंडू चणकापुरे (वय २० वर्ष), अनिकेत शंकर कोडापे (वय १८ वर्ष) अशी मृतकांची नावं आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच राजुरा आणि बल्लारपूर पोलीस यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.