अण्णा हजारेंचे ‘सिलेक्टिव’ बोलणे शंका उपस्थित करणारे – हेमंत पाटील
भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणावर अण्णा गप्प
पुणे, २३ फेब्रु. :- भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर देशात, परिवर्तनाचे आंदोलन उभे करणारे अण्णा हजारे हे प्रत्येकांसाठीच आदर्श ठरावे, असे व्यक्तीमत्व आहे. गेल्या काही काळात अण्णांनी स्वत:ला आंदोलन आणि इतर मुद्द्यांपासून अलिप्त ठेवले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात गाजलेला निवडणूक रोखे प्रकरण असो अथवा गौतम अदाणी यांच्या प्रकरणावर सोयीस्कर रित्या अण्णा गप्प होते. आता अण्णांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा द्यावेत, अशी मागणी केली आहे. पंरतू, काही निवडक मुद्दयांवर अण्णांचे बोलणे शंका उपस्थित करणारे आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी आज, रविवारी (ता.२३) व्यक्त केले.
काही मुद्द्यांवर ठरवून प्रतिक्रिया व्यक्त करीत राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न अण्णांकडून केला जातो, असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता काहींना राजकीय फायदा पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट लक्षात येते. पंरतु, मोजके राजकीय पक्ष आणि नेत्यांना अण्णांकडून लक्ष केले जाते, असा आरोप पाटील यांनी केला.मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यावर नैतिकेतेचे पालन करीत त्यांनी सर्वप्रथम राजीनामा दिलाच पाहिजे, यात दुमत नाही.पंरतू, अण्णांचा हेतू शुद्ध असेल तर, गेल्या काही काळात राज्यासह देशात समोर आलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर ते गप्प का होते? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
आरोप असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला अण्णांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. पंरतू, राज्य मंत्रिमंडळ स्थापन होत असतांना अण्णांनी आता घेतलेला पवित्रा का घेतला नाही, असा प्रश्न देखील पाटील यांनी विचारला आहे. अण्णांची भूमिका तटस्थ नसून ‘सोयीस्कर’ राजकारणाची आहे. इतर वेळी अण्णांचे काहीही न बोलने सर्वसामान्यांच्या मनात त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.