कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती शासकीय स्वरूपात साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. किशोर जोरगेवार

0
18

कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती शासकीय स्वरूपात साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. किशोर जोरगेवार

घुग्घूस येथे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या 149 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन

कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजप्रबोधन केले, श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत संपूर्ण समाजाला एक नवा विचार दिला. गाडगे महाराज यांनी आपल्या आयुष्यभर कष्टाला प्रतिष्ठा दिली. मेहनतीचे महत्त्व समाजाला पटवून दिले. त्यांच्या शिकवणींनी अनेकांना नवा मार्ग दाखवला. त्यांची 150 वी जयंती शासकीय स्वरूपात साजरी व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
धोबी परीट जनकल्याण संस्था, घुग्घूसच्या वतीने घुग्घूस येथे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या 149 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला धोबी परीट जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष सचिन क्षिरसागर, विलास भोसकर, निलेश मुक्के, बाबारावजी बोबडे, रामू भसारकर, शेखर तंगडपल्लीवार, भैय्या रोहणकर, अनिल तुगींडवार, संतोष नुने, विवेक बोढे, संजय तिवारी, मधुकर मालेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंग ठाकूर, विजय बंडावार, गीता क्षिरसागर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, घुग्घूस शहराचा सर्व सोयीसुविधांसह विकास करण्यासाठी मोठा निधी आपण येथे उपलब्ध करून दिला आहे. येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून ते शेवटच्या टप्प्यात आहे. शासकीय रुग्णालयाचे काम येथे पूर्ण झाले आहे. पुढेही अनेक विकासकामे या भागात करण्याचा आपला संकल्प आहे. घुग्घूस शहर वेगाने विकासाच्या मार्गावर प्रवास करत आहे. येथील अनेक कामे प्रस्तावित असून ती लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. येथे विविध समाजातील नागरिक राहतात, त्यामुळे समाजभवने तयार करण्यावरही आपण लक्ष केंद्रित केले असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आज धोबी परीट जनकल्याण संस्थेच्या वतीने उत्तम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढेही महाराजांच्या कार्याचा जागर घराघरात पोहोचावा, यासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजेत. त्यांच्या नावाने अभ्यासिका, व्याख्यानमाला, सामाजिक प्रबोधन शिबिरे आणि विविध कार्यक्रम सुरू करणे गरजेचे आहे. गाडगे महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी समाजासाठी एकत्र काम करून त्यांच्या शिकवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आज करण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले.
कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते समाजासाठी दीपस्तंभ होते. त्यांचे जीवन कष्ट, समर्पण आणि समाजप्रबोधनाचे प्रतीक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. मेहनतीला मान दिला आणि समाजात परिवर्तन घडवून आणले. गाडगे महाराजांचे विचार कालसुसंगत होते आणि आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. धोबी समाज त्यांचे विचार समोर नेण्याचे प्रामाणिक काम करत आहे. हा समाजही कष्टकरी समाज आहे. या समाजातील युवा पिढीने आता शासकीय योजनांचा लाभ घेत आर्थिक उन्नती साधावी. लोकप्रतिनिधी म्हणून समाजाला येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आजच्या या पवित्र सोहळ्यात सहभागी होताना मनात एक ठाम संकल्प असून पुढील वर्षी आपण गाडगे महाराजांची 150 वी जयंती शासकीय स्वरूपात साजरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी शासनदरबारी योग्य ती मागणी मांडली जाईल आणि या थोर संताच्या कार्याचा अधिकाधिक प्रसार केला जाईल. गाडगे महाराज हे फक्त एका समाजापुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव प्रत्येक पिढीने केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here