राजुरा तालुक्यातील टेंभूरवाही येथे अवैध दारूचा धुमाकूळ
महिलांची उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्यात धडक
राजुरा, ता.प्र. –
राजुरा तालुक्यातील टेंभुरवाही येथील शेकडो महिलांनी आपल्या गावातील अवैध दारू बंद करावी आणि आमचे उद्ध्वस्त होत असलेले संसार वाचवावे, अशी मागणी करीत दिनांक 4 फेब्रुवारीला दुपारी राजुरा उपविभागीय अधिकारी, राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी आणि विरूर स्टेशन ठाणेदार यांचे कार्यालयावर धडक देऊन आपली कैफ़ियत मांडली. एवढ्या छोट्या गावात आठ दारूविक्रेते असून या अवैध दारूविक्रेत्यांची गावात मोठी दहशत आहे. यावेळी अनेक महिलांनी आपली आपबीती सांगून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
राजुरा येथून 15 किलोमीटर अंतरावरील टेंभूरवाही हे गाव असून या गावात सध्या दारूविक्रेत्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. येथे आठ जण अवैध दारू विक्री करीत असून काही घरून, काही पानठेल्यावरून तर काही चहा सेंटर, उपहारगृह येथुन दारू विक्री करतात. एका सधन व्यक्तीने तर बस स्थानकावर अवैध दारू विक्री करण्यासाठी पगारी नौकर ठेवून अवैध दारूविक्रीचे दुकान थाटले आहे. अनेक अवैैध दारूविक्रेते तर फोन आल्यावर जिथे हवी असेल तिथे दारू पोहचवून देतात. या दारूच्या महापूरामुळे गावातील शेतकरी, तरूण मुले बिघडली असून याचा महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक महिलांना रोज दारू पिवून आलेल्या पतीचा मार सहन करावा लागतो तर अनेक पुरूष आपल्या पत्नी व आईला रात्री घराबाहेर काढतात, यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला आहे. मजुरी करून घरचा प्रपंच चालविण्याऐवजी दारूसाठी पैसे खर्च करीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात नेहमी दारू मिळत असल्याने तरुण मुलेही दारूचे अधिन होत असून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या गावात दारू ने एवढा कहर केला आहे की अखेर महिलांनी ग्रामपंचायतीला साकडे घालून ग्रामसभा आयोजित करायला लावली. त्यात अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून तरूण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. त्यामुळे तातडीने दारू बंद करण्याच्या मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव का मंजूर केला म्हणून अनेक अवैध दारूविक्रेते या महिलांच्या घराजवळ येऊन शिवीगाळ करतात आणि मारण्याची धमकी देतात, असा आरोप केला.
आज दिनांक 4 फेब्रुवारी ला गावातील शेकडो महिला आपली मजूरी बुडवून राजुरा येथे आल्या आणि त्यांनी उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपक साखरे यांचे कडे निवेदन दिले आणि आपली कैफ़ियत मांडली. या महिलांनी राजुरा पत्रकार संघात येऊन आपले निवेदन दिले. आमच्या गावातून दारू हद्दपार करा आणि आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची आग्रही मागणी राजुरा पत्रकार संघाकडे या महिलांनी केली.