बांबू कारागिरांना अम्माच्या नावाने कौशल्य पारितोषिक पुरस्कार देणार – आ किशोर जोरगेवार
बांबू प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बुरुड कारागिरांना टूल किट वितरण कार्यक्रम
आजचा हा कार्यक्रम बुरुड कारागिरांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या कौशल्याला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत नव्या उंचीवर नेण्यासाठी हा टूल किट वाटप उपक्रम राबवला जात आहे. या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढल्या वर्षी पासून आपण पुढाकार घेणार असून अम्मा च्या नावाने बांबू कारागिरांना कौशल्य पारितोषिक देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
बांबू प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वन अकादमी येथे बुरूड समाजातील बांबू कारागिरांना टूल किट चे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला वन अकादमी चे अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक एम.एस रेड्डी, बांबू प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, भाजप नेते प्रकाश देवतळे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज माझ्या हस्ते टूल किट देण्यात आली. त्यामुळे आपला पारंपरिक व्यवसाय टिकविण्यासाठी एका बुरूड समाजाच्या व्यक्तीने समाजाच्या दुसऱ्या व्यक्तीला शस्त्र दिल्याचा अधिक आनंद होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कारागिरांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम आपल्या वतीने केल्या जात आहे. बांबू हा रोजगार देणारे साधन आहे. वन विभागानेही अश्या कारागिरांना आवश्यक असलेल्या बांबू उपलब्ध करून दिला पाहिजे. बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आता प्रत्येक वॉर्डात प्रशिक्षण शिबिरे सुरू केले पाहिजेत. यात लागणारी मदत करण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचे ते यावेळी म्हणाले.
बूरूड कारागीरांनी आपली कला व कौशल्य टिकवून ठेवत समाजात मोठे योगदान दिले आहे. बांबू पासून विविध वस्तू तयार करत आपल्या कलेचा ठसा केवळ आपल्या प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशभर उमटला आहे. परंतु बदलत्या काळानुसार आपणही नवे तंत्रज्ञान, नवे साधनसामग्री आत्मसात केली पाहिजे, या टूल किटद्वारे आपले काम अधिक सुलभ आणि दर्जेदार होईल. यामुळे आपण अधिक उत्पादन करू शकाल, गुणवत्ता वाढेल, आणि आपल्या उत्पादनांना बाजारपेठेत अधिक मागणी मिळणार आहे.
नवे कौशल्य आत्मसात करत आपल्यातील कला दुसऱ्या पर्यंत पोहचविण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते बुरूड कारागिरांना टूल किट चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला कारागिरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.