वीर बाल दिवस सत्य, धर्म आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देत राहील – आ. किशोर जोरगेवार

0
72

वीर बाल दिवस सत्य, धर्म आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देत राहील – आ. किशोर जोरगेवार

खालसा कॉन्व्हेंट येथे वीर बाल दिवस कार्यक्रमाचे आयोजन

 

गुरू गोविंदसिंहजी यांच्या सुपुत्रांनी दाखवलेले पराक्रम आणि त्याग यांचे स्मरण आज आम्हाला प्रेरणा देते. आजचा दिवस केवळ एक स्मरणोत्सव नाही, तर मुलांना संस्कार, शौर्य, त्याग आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची उर्जा देणारा हा दिवस आहे. आजचा वीर बाल दिवस आपल्याला कायमच सत्य, धर्म आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
वीर बाल दिवस निमित्त आज गुरुवारी खालसा कॉन्व्हेंटमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लाडी बसेसा, भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, मुख्याध्यापिका सिमरन सहाणी, अमनप्रती गौरा, विश्वजित शाहा आदि प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. मुलांनी आणि युवकांनी या प्रेरणादायी इतिहासातून शिकावे, आपली संस्कृती, परंपरा आणि आदर्श जपावेत. या प्रसंगातून एकजुटीचा संदेश घेऊन पुढे जावे. आपल्या समाजातील मूल्यांना टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. विशेषतः आजच्या पिढीने आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि न्यायासाठी सदैव तत्पर राहावे, ही प्रेरणा देणारा आजचा दिवस असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आजच्या दिवशी आपण ज्यांनी आपल्या शौर्याने आणि त्यागाने इतिहास घडवला, अशा महान बालवीरांना आदरांजली अर्पण करतो. लहान वयातसुद्धा मोठमोठ्या संकटांना तोंड देणाऱ्या वीर बालांनी आपले मोठे योगदान देशासाठी दिले आहे. गुरू गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहिबजादे यांचा बलिदान, हा त्याग आणि धर्मासाठी दिलेली आहुती आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या शौर्याने धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा आदर्श घालून दिला आहे.
आपली नवी पिढी ही देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ आहे. त्यांना योग्य शिक्षण, मूल्यसंस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व शिकविणे ही आपली जबाबदारी आहे. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने, आपण आपल्या मुलांमध्ये देशप्रेम, आत्मसन्मान आणि आदर्श नागरिक होण्याची वृत्ती रुजवावी, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here