चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी द्या – आ. किशोर जोरगेवार
अधिवेशनात बोलताना केली मागणी…
चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र येथे आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, सदर मेडिकल कॉलेज रुग्णसेवेसाठी तात्काळ सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
शनिवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचा विषय उचलत साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
बहुप्रतिक्षित चंद्रपूर मेडिकल कॉलेजची सुमारे ५० एकरातील नवीन वास्तूचे बांधकाम पूर्णत्वास आले असले तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध झाला नाही. साहित्य खरेदीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची आवश्यकता असून, तातडीने हा निधी मिळावा म्हणून कॉलेज प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी ५७ कोटी रुपये तर वैद्यकीय साहित्यासाठी ४१ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र सदर प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
लगतच्या गडचिरोली, यवतमाळ, तेलंगणातील आसिफाबाद, करीमनगर या भागातील रुग्णसुद्धा चंद्रपुरात उपचारासाठी येत असतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नव्या जागेतील इमारतीत कॉलेज हलविण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत आहे. परंतु, आवश्यक साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने सर्व काम रखडले आहे.
हाच विषय आता आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उचलून धरला. यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारे 100 कोटी रुपये न मिळाल्याने रुग्णालय बंद आहे. अतिशय सुंदर परिसरात सुंदर वास्तू तयार झाली असली तरी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालय सुरू होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तात्काळ साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली आहे.