रोजगार प्रक्रिया गतिमान करा – आ. किशोर जोरगेवार
बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने येथे उद्योगांमध्ये कामगारांची आणि सुरक्षारक्षकांची नेहमी मागणी असते. मात्र, या जागा भरताना गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगार देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. यामुळे शासन स्तरावरील अडचणी आमच्या माध्यमातून सोडवून घेत रोजगार प्रक्रियेची गती वाढवावी आणि ती योग्य पद्धतीने राबवावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांना दिले आहेत.
आ. किशोर जोरगेवार यांनी गार्ड बोर्डच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या कार्यालयात कामगार संघटनांचे नेते, कामगार प्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेसह इतर कामगारांच्या रोजगार समस्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, ‘‘गार्ड बोर्डमध्ये नोंदणीकृत असलेल्या कामगारांना रोजगार मिळवून देणे ही गार्ड बोर्डची जबाबदारी आहे. कामगारांच्या अडचणींना समजून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणी नंतर सिएटीपीएस येथील सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेबाबत कामगार मंत्री हसन मुशरिफ यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी गतीने व्हावी, यासाठी आमदार जोरगेवार यांनी पुढाकार घेत बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी गार्ड बोर्डकडून होणार्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आणि ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नोंदणी प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांत संबंधित कंत्राटदारांशी संपर्क साधून नोंदणी लिंक सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. लिंक सुरू झाल्यानंतर कामगारांनी त्वरित नोंदणी करून आपली शारीरिक चाचणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीदरम्यान, आ. जोरगेवार यांनी स्पष्ट केले की, गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये. शासन पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, पण कामगारांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.