कुर्ला बस अपघातः या अक्षम्य कारभारास बेस्ट प्रशासन जबाबदार, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे

0
18

कुर्ला बस अपघातः या अक्षम्य कारभारास बेस्ट प्रशासन जबाबदार, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची संतप्त प्रतिक्रिया

 

मुंबईतील कुर्ला बेस्ट बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री एलबीएस मार्गावरील मार्केटमध्ये भरधाव वेगाने आलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांसह नागरिकांना धडक दिली. यावर आता अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या अपघातावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगर रोड भागात भरधाव बेस्ट बसने धडक दिल्याने घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. अपघातात ७ जणांचा मृत्यू आणि ४९ नागरिक गंभीर जखमी झाल्याचे माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.

पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले, या अपघातातील बस चालक हा कंत्राटी असून चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोठी वाहन चालवण्याचा अनुभव नसताना या ड्रायव्हरला काम मिळाले कसे, एवढी मोठी बस चालवायला देताना आधी तपासले नव्हते का, हा ड्रायव्हर बस चालवू शकतो का? या अक्षम्य कारभार साठी बेस्ट प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांना आणि अपघातात जखमींना तातडीने सरकारने मदत द्यावी ही आमची मागणी आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक आज बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here