प्रचारात नागरिकांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादातून विक्रमी विजयाचा विश्वास – आ. किशोर जोरगेवार
आमदार किशोर जोरगेवार यांनी पदयात्रेतून पालथा घातला मतदारसंघ
आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मागील 22 दिवसांपासून आपण विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. झालेली विकासकामे आणि पुढे करावयाची कामे मतदारांना सांगितली. यावेळी सभा, बैठका, पदयात्रा यांना चंद्रपूरकरांनी उत्साही प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी विजयाचा विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचाराची तोफ थंडावली आहे. मात्र, या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पूर्ण ताकद लावली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुकूम, बाबुपेठ, जुनोना चौक या भागांमध्ये भव्य पदयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्यांनी आंबेडकर नगर येथील महा विहार येथे जात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाथेरो डॉ, सुमनवन्णो यांनी आ. जोरगेवार यांना आशीर्वाद दिला.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण अपक्ष असूनही चंद्रपूरसाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. बाबुपेठ उड्डाणपुलासाठी साडे पाच कोटी रुपये मंजूर करून शेवटचे काम पूर्ण केले आहे. आज हा पूल नागरिकांसाठी सुरू झाला आहे. वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. धानोरा बॅरेजचे कामही लवकर सुरू होणार आहे.
आपण 11 अभ्यासिकांचा संकल्प केला होता, मात्र आता 11 पेक्षा जास्त अभ्यासिकांचे काम मतदारसंघात सुरू आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्या कामांचे भूमिपूजनही पार पडले आहे. गावांमध्ये पांदण रस्ते, सामाजिक सभागृह तयार केले आहेत. घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर केल्याने या शहराच्या विकासाला गती मिळाली आहे.
आपण विकासकामांसह सामाजिक उपक्रमांतूनही नागरिकांच्या सतत संपर्कात राहिलो आहोत. चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकालीची महती महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून देशभर पोहोचवली आहे.
आज आपल्यात अम्मा नाही, मात्र तिच्या प्रेरणेने सुरू झालेला “अम्माचा का टिफिन” उपक्रम नेहमी सुरू राहील. या उपक्रमाद्वारे आपण 200 हून अधिक नागरिकांना घरपोच जेवणाचा टिफिन पोहोचवत आहोत. कार्यालयात कार्यरत सेतू केंद्राद्वारे अनेक नागरिकांचे शासकीय योजनांचे कागदपत्रे निशुल्क तयार करून देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
बाबुपेठ येथील पदयात्रेदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नेताजी चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.