बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार

0
16

बाबुपेठच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार – आ. किशोर जोरगेवार

बाबुपेठ येथे स्नेहमिलन आयोजन

 

बाबुपेठ येथे कष्टकरी बांधव राहतात. येथील नागरिकांचे माझ्यावर नेहमीच स्नेह राहिले आहे. आज इतर व्यवस्था होती, मात्र बाबुपेठ येथील निमंत्रण कळताच मी येथे आलो. आपले हे प्रेम नेहमी कायम ठेवा. प्रत्येक संकटात मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. बाबुपेठमध्ये आपण अनेक विकासकामे केली आहेत, मात्र या भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
बाबुपेठ येथील बाबा नगर येथे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी माजी नगरसेवक राजकुमार उके, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत उंदीरवाडे, वंदना हातगावकर, बाबा नगर बुद्धविहार कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत चंद्रपूर शहराचा विकास करताना आपण बाबुपेठ वार्डाकडे विशेष लक्ष दिले. येथील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. बाबुपेठ उड्डाणपुलासाठी आपण नेहमी आग्रही राहिलो. काम शेवटच्या टप्प्यात असताना निधीअभावी रखडले होते. मात्र आपण पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देऊन ते काम पूर्ण केले. आता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
बाबुपेठ भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात जावे लागत होते.
ही समस्या लक्षात घेऊन आपण बाबुपेठ येथील महादेव मंदिराच्या परिसरात साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून अभ्यासिका तयार करत आहोत. या अभ्यासिकेच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. आंबेडकर नगर येथे आपण भव्य विपश्यना केंद्र उभारत आहोत. तसेच टावर टेकडी भागात पाच कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते आणि नाल्यांची कामे पूर्ण केली आहेत.
बाबुपेठ भागावर माझे विशेष प्रेम राहिले आहे. त्यामुळे या भागातील विकासकामांना नेहमी प्राधान्य दिले आहे. सावित्रीबाई फुले शाळेसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही स्मार्ट शाळा बनविण्याचा संकल्प आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाईल. यात रस्ते, बगीचे, अभ्यासिका, समाजभवन अशा सर्व मूलभूत सुविधा समाविष्ट असतील, असेही ते म्हणाले. या स्नेहमिलन कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here