रिपब्लिकन नेते सिध्दार्थ पथाडे व कार्यकर्त्यांचा चटप यांना पाठिंबा…
राजुरा :- रिपाई आठवले गटाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलेले रिपब्लिकन नेते सिध्दार्थ पथाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी संघटनेचे उमेदवार वामनराव चटप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चटप यांच्या मतांमध्ये भर पडणार आहे.
सध्या मतदारसघांत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार मतदारांकडे मताचा जोगवा मागत आहे. सगळीकडे प्रचाराचे भोंगे वाजत असतानाच दुसरीकडे मात्र काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. दरम्यान महायुतीत रिपाइं आठवले गटाचा सहभाग आहे. मात्र लोकसभे नंतर विधानसभेत आठवले गटाला एकही जागा दिल्या नसल्याने पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष सिध्दार्थ पथाडे यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासोबत काही तालुका व शहर प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. या राजीनामा सत्रामुळे महायुतीला हादरा बसला आहे.
आता रिपब्लिकन नेते सिध्दार्थ पथाडे यांनी संघटनेचे उमेदवार वामनराव चटप यांना पाठिंबा दिला आहे. सोबतच त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील चटप यांना समर्थन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चटप यांना रिपब्लिकन सहकार्याची साथ मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळणार असे संकेत मिळत आहे.