काॅंग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांना करावा लागतोय अँटी इन्कमबन्सी चा सामना
पाच वर्षांतील अनेक मुद्द्यांमुळे प्रचारात काॅंग्रेसची अडचण
राजुरा :- मागील विधानसभा निवडणूकीत काॅंग्रेस पक्षाचे श्री. सुभाष धोटे यांचा केवळ बावीसशे मतांनी निसटता विजय झाला होता. शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांचे सोबत अटीतटीची लढत झाली होती. त्यानंतर गेली पाच वर्षे आमदार सुभाष धोटे यांचा कार्यकाळ नागरिकांसाठी फारसा आशादायी ठरला नाही. ग्रामीण भागातील रस्ते, पांदन रस्ते, पाणी, आरोग्याच्या सोयी याबाबत नागरिक निराश झाले. विकासकामांची फक्त जाहिरात, मात्र काम दिसले नाहीच. त्यासोबतच त्यांच्या वक्तव्याने सामान्य नागरिकच नव्हे तर कार्यकर्तेही घायाळ झाले. गावात अथवा परिसरात विकासकामे तर झाली नाहीच उलट स्वाभीमान दुखावल्याने नाराज असलेल्यांची संख्या मोठी असल्याने या अँटी इन्कमबन्सी चा सामना आता काॅंग्रेस नेते व कार्यकर्त्यांना गावागावात करावा लागत आहे.
कोरपना तालुक्यातील आवाळपूर असो, गोंडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा असो की बारा गावातील गावे असो, आमदार सुभाष धोटे यांच्या असहिष्णु वृत्तीचा नागरिकांनी अनुभव घेतला आहे. आता गावागावात याबाबत मतदार चर्चा करीत असुन त्याचा सरळ परिणाम दिसून येत असून नुकसान होणार असल्याची चिन्हे आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीत आपल्या काॅग्रेसचीच सत्ता असली पाहिजे, यासाठी सुभाष भाऊंचा आग्रह असे. हे पक्षवाढीसाठी ठीक ही आहे. मात्र जर विरोधी पक्षाची सत्ता आली तर त्यांच्या गावातील कोणतेच काम करायचे नाही. त्यांना व तेथील गावातील लोकांना अपमानास्पद उत्तरे द्यायची याची मोठी चर्चा गावात व्हायची. आता प्रचाराला जातांना या जुन्या बाबी प्रकर्षाने समोर येत असून या अँटी इन्कमबन्सी चा फटका काॅग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांना मोठ्या प्रमाणात बसणार असल्याची गावागावात चर्चा आहे. आता काॅंग्रेस कार्यकर्ते याबाबत कशी डागडूजी करतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.