नारंड्यात गॅस्ट्रोची साथ, उपचारादरम्यान महिला दगावली
ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष?
कोरपना प्रतिनिधी
कोरपना : नारंडा गावात अलिकडच्या काळात साथीचे आजार वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी सुंदराबाई उपासे वय ६५ नामक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिव्या संदीप मोहूर्ले, वैदही गणपत वाडगुरे, लीलाबाई नीकुरे, पूनम लोनबले, आदित्य निकुरे, वैष्णवी परसुटकर यांच्यासह जवळपास २५-३० रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेत असून गावातील परिस्थिती गंभीर आहे. गावात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशाप्रकारचा आजार पसरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर केला आहे.
गावात गटारांचे पाणी रस्त्यावर वाहत असून सर्वत्र घाण पसरली आहे. तसेच कचरा व्यवस्थापन पण चुकीचे आहे. सर्वत्र अस्वच्छता असल्याने गॅस्ट्रोची लागण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात पाणी शुद्ध नसल्यामुळे तथा पाण्याचा टाकीची स्वच्छता नियमित होत नागरिकांचा आरोप आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी यासाठी संवर्ग विकास अधिकारी व ग्रामपंचायतीकडे आम्ही लेखी निवेदन दिले आहे. त्वरित रोगप्रतिकारक फवारणी करून व गाव स्वच्छ करून साथीचे रोग नियंत्रणात आणावे अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसणार. – वैभव हिराजी वांढरे, ग्रामस्थ, नारंडा
आरोग्य विभागाचा वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. लवकरच साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. – डॉ. स्वप्नील टेंभे, तालुका आरोग्य अधिकारी, कोरपना