शोकसंदेश
निराधारांचे मातृतुल्य छत्र कायमचे हरपले – श्याम धोपटे
अम्माच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची तब्येत सुधारत होती, आणि मी त्यांच्या प्रकृतीची नियमित विचारपूस करत असे. मात्र आज सकाळी अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि मन सुन्न झाले. त्यांच्या जाण्याने अनेक निराधारांचे मातृतुल्य छत्र कायमचे हरपल्याचे श्याम धोपटे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
अनेक कार्यक्रमांमध्ये अम्मांना भेटण्याचा योग आला. त्यांच्या विचारांनी मी प्रेरित झालो. ‘‘काम करायला लाज कसली?‘‘ असे म्हणत त्यांनी स्वतःच्या टोपल्या विकण्याच्या कामाबाबत चर्चा केली होती. ‘‘बेमानीने कमावलेल्या पैशाने संपन्नता मिळवू शकता, मात्र समाधान केवळ प्रामाणिकतेतून मिळते,‘‘ हे अम्मांचे शब्द कायम मार्गदर्शन करणारे होते. त्यांना भजनाची आवड होती, त्यामुळे भेट झाली की ‘‘तुझे भजन कुठंय?’’ असे त्या आवर्जून विचारायच्या. त्यांच्या “अम्मा का टिफिन” उपक्रमामुळे अनेकांना आधार मिळाला आहे, आणि तो राज्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. आज त्या आपल्यात नाहीत, मात्र त्यांचा कष्ट आणि प्रामाणिकतेचा विचार सदैव मार्गदर्शक ठरेल, असे श्याम धोपटे यांनी आपल्या शोकसंदेशातून म्हटले आहे.