आ. किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर धानोरा बॅरेजला प्रशासकीय मान्यता
शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार ; पहिल्या टप्यात ५ कोटी ४२ लाख रुपयांची मंजुरी
चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावाजवळील वर्धा नदीवर बॅरेज बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी चंद्रपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून, या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्यात ५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वर्धा नदीच्या पाण्याचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्यासाठी आणि परिसरातील शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने धानोरा बॅरेज प्रकल्प हा महत्त्वाचा ठरणार आहे. धानोरा बॅरेज बांधकाम प्रस्तावाच्या सर्वेक्षण, संकल्पना, आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने केंद्रीय संस्थेसोबत करार केला आहे. मात्र या उपसा सिंचन योजनेसाठी मान्यता शासनाकडून मिळत नव्हती. त्यामुळे या कामाला प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्यात ५ कोटी ४२ लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
सदर प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, या प्रकल्पामुळे आसपासच्या शेकडो हेक्टर शेतीचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच, पाण्याच्या भूजलपातळी वाढण्यास व पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वाहणाऱ्या वर्धा नदीवर लोअर वर्धा धरणाखाली सध्या कोणताही मोठा प्रकल्प नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काचे सुमारे ७३६ दलघमी पाणी विनावापर तेलंगणात वाहून जात आहे. या पाण्याचा काही भाग चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्याच्या उद्देशाने धानोरा बॅरेज बांधण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली होती.