महाकाली महोत्सव म्हणजे लोकभावनेतून सुरू झालेला लोकउत्सव – आ. किशोर जोरगेवार
मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात
माताभक्त आणि चंद्रपूरकरांची प्रतीक्षा आज संपली. आपल्या मातेच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा महोत्सव देशपातळीवर पोहोचला आहे. या महोत्सवाला मिळणारा लोकसहभाग उत्साहवर्धक आहे. एकंदरित हा महोत्सव म्हणजे लोकभावनेतून सुरू झालेला लोकउत्सव असल्याचे प्रतिपादन श्री माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज सकाळी १० वाजता माता महाकाली मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महाआरतीने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माता महाकाली महोत्सव ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल, कल्याणी किशोर जोरगेवार, मनीष महाराज, चंदू वासाडे, राजू शास्त्रकार, श्याम धोपटे, मिलिंद गंपावार, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे, जयश्री कापसे-गावंडे, मनीषा पडगेलवार, सायली येरणे, आदी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजच्या या महोत्सवासाठी मागील अनेक महिन्यांपासून ट्रस्ट समितीने आणि माताभक्तांनी काम केले आहे. वेळोवेळी नियोजनाच्या बैठकांना आपली आवर्जून उपस्थिती राहिली. खरंतर याच नियोजनात माताभक्त आणि चंद्रपूरकरांनी आपल्या हातात घेतले होते. याचाच परिणाम म्हणून आज इतका भव्य कार्यक्रम आपण यशस्वी करत आहोत. पुढील पाच दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण मातेची भक्ती करणार आहोत. बाहेरील कलाकारांना आमंत्रित करताना चंद्रपूरातील कलावंतांनाही संधी मिळावी यासाठी आपण हा मंच उपलब्ध करून दिला आहे. या महोत्सवाचे आयोजन येथील पर्यटन, स्थानिक कलावंत यांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांच्या पालकांना कमिटीच्या वतीने चांदीचा सिक्का देण्यात आला. घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा या महोत्सवात सत्कार करण्यात आला. महोत्सव निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. दुपारी १ वाजता गायत्री कोतपल्लीवार यांनी देवीचे नवस्वरूप या विषयावर संगीतमय प्रवचन दिले. दुपारी ३ वाजता शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक विषयावर सामूहिक नृत्य सादर केले.
उद्याचे कार्यक्रम
सकाळी ९ वाजता महाकाली मातेच्या आरतीने होणार आहे. सकाळी १० वाजता ९९९ ज्येष्ठ माऊलींचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. दुपारी १ वाजता सूर्योदय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने जागर कवितेचे हे महिलांचे कवी संमेलन पार पडणार आहे. दुपारी ३ वाजता स्थानिक कलावंतांच्या नृत्य जल्लोष, संध्याकाळी ५ वाजता भजन व आरती, तर संध्याकाळी ६ वाजता ‘राम आयेंगे राम आयेंगे’ या गाण्याच्या सुप्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांचा भक्तिमय संगीत कार्यक्रम होणार आहे.
माता महाकालीच्या शोभायात्रेने महोत्सवाला सुरुवात
आज जैन मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला सुरुवात झाली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले.
पाच दिवस चालणाऱ्या श्री माता महाकाली महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजता सराफा असोसिएशनच्या वतीने जैन मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत माता महाकालीची चांदीची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल झाली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहपत्नीक मातेची पूजा करून शोभायात्रेत सहभाग घेतला. सदर शोभायात्रा महाकाली महोत्सव पेंडालात पोहोचल्यानंतर मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.