काँग्रेस हा सर्वधर्म समभाव विचारधारेचा पक्ष – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 

0
73

काँग्रेस हा सर्वधर्म समभाव विचारधारेचा पक्ष – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 

सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे भूमिपूजन व सत्कार समारंभ 
देशात जाती – धर्मात भांडणे लावून अराजकता पसरवू पाहणाऱ्या मनुवादी विचारांच्या सत्ताधाऱ्यांनी देशाचे पुरते वाटोळे केले आहे.अशा देश विघातक मनुवादी विचारांतून बहुजनांना गुलाम बनवू पाहणाऱ्या शक्तींना समूळ नष्ट करण्यासाठी, देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस या सर्व धर्म समभाव विचारधारेच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे आयोजित भूमिपूजन सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, सावली माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश सिद्धम, तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, महीला आघाडी अध्यक्षा उषा भोयर, माजी प. स. सभापति विजय कोरेवार, पांडुरंग पा. तांगडे, काँग्रेस जिल्हा सचिव बंडू बोरकुटे, उंदिरवाडे गुरुजी, लहानुजी कुळमेथे, अंतरगाव सरपंच कवींद्र लाकडे, निमगाव उपसरपंच राजू ठाकरे, सुरेश शेरकी, खुशाल लोढे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील त्रिकूटांच्या सरकारकडून राज्य लुटण्याचे कार्य सुरू आहे. येथील प्रकल्प गुजरातला पळवून महाराष्ट्राला कंगाल करण्यामध्ये राज्य सरकारचा सिंहाचा वाटा आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणून थोतांड गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे  विविध वस्तूंचे दर वाढ करून बहिणींच्याच तिजोरीवर डल्ला मारायचा. असे या महापापी सरकारचे कृत्य असून या सरकारला तुम्ही मतदानातून धडा शिकवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा सत्कार करण्यात आला.तर लोकसभेच्या विजयात जी कामगिरी आपण बजावली त्यापेक्षाही अधिक जोमाने काम करून लोकशाही विघातक राज्यातील सरकारला सत्तेतून खाली खेचा असे आवाहन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले.
शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश …
सावली तालुक्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विकास कामांचा झंजावात व सक्षम नेतृत्व यावर विश्वास ठेवून तालुक्यातील गायडोंगरी, अंतरगाव, उसरपार चेक, खानाबाद अंतरगाव पोहा हेटी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला राम राम ठोकत काँग्रेस पक्ष प्रवेश केला. भाजपा केवळ सत्तापिपासू पक्ष असून गोरगरीब जनतेला बोल थापा देऊन त्याचे शोषण करीत आहे. हे आता सामान्य नागरिकांच्या लक्षात आले. यामुळेच भाजपाला गळती सुरू झाली आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केल्या जात असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here