घुग्घुस शहराचे अत्याधुनिक सिटी सर्वेक्षण होणार – विवेक बोढे
घुग्घुस : शहराचे भूमी अभिलेख कार्यालय व महसूल विभागातर्फे रोव्हर मशीन, ड्रोन टेक्नॉलॉजी, टोटल स्टेशन मशीनद्वारे अत्याधुनिक सिटी सर्वेक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी दिली आहे.
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांना अत्याधुनिक सिटी सर्वेक्षण करण्याची मागणी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी सातत्याने केली होती. त्या अनुषंगाने अत्याधुनिक सिटी सर्वेक्षण करण्यात येत असल्याने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मागणीला यश आले आहे.
त्यामुळे घुग्घुस शहराचा शास्त्रशुद्ध नकाशा तयार होईल, नागरिकांना मालकी हक्काची कागदपत्रे मिळतील, मालकी कागदपत्रे तपासून मिळणार, जमिनीचे मोजमाप झाल्याने नागरिकांचे वाद विवाद कमी होईल, अतिक्रमण धारक व मुळ मालक यातील फरक स्पष्ट होणार आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून लोकसंख्या ५० हजारांचा जवळपास आहे. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण मोठया प्रमाणात आहे, शहरात काही ठिकाणी अरुंद रस्ते आहे त्यामुळे ये-जा करतांना अडथळा निर्माण होतो. अशा अनेक समस्या लवकरच सुटणार आहे.