चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील केळी गावातील समस्या: स्मशानभूमीपर्यंत रस्ता न मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप
वरोरा: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील केळी गावातील नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावापासून नदीजवळील स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता नाही, ज्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग अधिकच बिकट होतो. पावसाच्या काळात रस्त्यावर गुडघाभर चिखल साचतो, ज्यामुळे पायी चालणे देखील कठीण होते. अशा परिस्थितीत प्रेतवाहन जाण्याची शक्यता तर दूरच राहते. गावातील नागरिकांना पावसाळ्यात कुठेही जागा पाहून अंत्यसंस्कार करावे लागतात, कारण नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे अशक्य ठरते.
गेल्या 10 वर्षांपासून गावकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे 800-900 मीटरचा हा रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. हा रस्ता फक्त स्मशानभूमीसाठीच नाही, तर नदीकाठच्या शेतांमध्ये जाणारे शेतकरी आणि गुरे चरण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या समस्येची गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत केळी उखर्डा मार्फत तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार भेट देऊन समस्या मांडली आहे, परंतु आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यांनी असा इशारा दिला आहे की, आगामी दोन महिन्यांत या समस्येचा निराकरण झाला नाही, तर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला जाईल.
राजुभाऊ झापर्डे व समस्त गावकरी यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे की, या गंभीर समस्येची तातडीने सोडवणूक केली जावी.